आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात पुरातन आणि भारतीय उपचार पद्धती म्हणून आयुर्वेदाची ओळख आहे. आयुर्वेदाला जागतिक अधिष्ठान मिळण्यासाठी आयुर्वेदाची प्रॅक्टिस ही शुद्ध स्वरूपात होणे गरजेचे आहे. जगभरातून आयुर्वेदाला मागणी मिळाल्यास त्याला आपोआपच राजाश्रय मिळेल. आयुर्वेदाची शुद्ध प्रॅक्टीस आपल्याकडे झाली तर लोकाश्रय आणि राजाश्रय मिळून ही उपचार पद्धती जगमान्य होईल, असा विश्वास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय "आयुर्वेद पर्व' आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पूर्व नागपुरातील सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते.
या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते. या कार्यक्रमाला, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांची उपस्थिती होती.
वर्तमानात जगभरामध्ये अनेक उपचार पद्धती प्रचलित आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. यापैकी आयुर्वेद ही अस्सल भारतीय उपचार पद्धती म्हणून जगभरात ओळखली जाते. मध्ययुगीन कालखंडापर्यंत देशात आयुर्वेद ही एकमेव उपचार पद्धती प्रचलित होती. या उपचार पद्धतीत वेळोवेळी संशोधन करून तज्ज्ञ लोक भर घालत होते. परंतु, भारतावरील परकीय आक्रमणांमुळे आयुर्वेदातील संशोधने आणि उपचार पद्धती म्हणून त्याचा वापर कुठेतरी मागे पडत गेला. या उपचार पद्धतीला गतवैभव परत मिळवून द्यायचे असेल तर केवळ आयुर्वेदाची शुद्ध प्रॅक्टीस करावी लागेल. असे झाल्यास समाजातील लोकांना आयुर्वेदाचा अधिकाधिक उपयोग करून योग्य उपचार करून घेता येतील, असे सरसंघचालकांनी सांगितले.
आयुर्वेद उपचारपद्धतीने लोक रोगमुक्त झाल्यास आणि तिचा समाजातील वापर वाढल्यास लोकाश्रय आणि राजाश्रय मिळणे सोपे होईल. या उपचार पद्धतीला राजाश्रय मिळाला तर जागतिक आरोग्य संघटने सारख्या संस्थांनाही आयुर्वेदाची महती, उपयुक्तता अधोरेखित करावी लागले. परंतु, त्यासाठी आगामी 25 वर्षांचे ध्येय निश्चित करून आयुर्वेदाची शुद्ध प्रॅक्टीस करणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले.
आयुर्वेद या प्राचीन वैद्यक पद्धतीला वैज्ञानिक पुराव्याद्वारे 21 व्या शतकात प्रस्थापित करण्यावर आपला भर असला पाहिजे. यासाठी संशोधन आणि विकास यामध्ये भरीव कार्य होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात जे विद्यार्थी, संशोधन, निर्माते, वैद्य आहेत त्या सर्वांनी एकत्रितपणे भविष्यात असा कार्यक्रम आखावा ज्यामुळे विश्वात नेतृत्व करू शकू अशी अपेक्षा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.