आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली-गोंदीयात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरूच:घरात झोपल्यानंतर हत्तीने पायखाली तुडवले, वृद्ध जागीच ठार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया जिल्ह्यात धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात परतला. शनिवारी या कळपाने एका वृद्ध व्यक्तीला पायाखाली तुडवून ठार केले. ही घटना रविवारी उघडकीस आली धनसिंग टेकाम (71 रा. तलवारगड) असे मृत व्यक्तीचे नाव असून हत्तींनी हल्ला केला तेव्हा ते घरी झोपून होते.

छत्तीसगडहून गडचिरोलीत

छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप गडचिरोली ते गोंदीया जिल्ह्यात ये- जा करीत आहे. या रानटी हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ अजूनही संपलेला असून शेतीपिकांची नासाडी करण्यासोबत कळप गावकऱ्यांचेही बळी घेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने या हत्तींना परत पाठवण्याची मागणी होत आहे.

रानटी हत्तींची दहशत

कोरची तालुक्यात मागील दोन दिवसांपासून रानटी हत्तींची दहशत आहे. वनविभागदेखील या कळपावर नजर ठेऊन आहे. अशातच शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास २० हत्तींच्या कळपाने तलवारगड गावात प्रवेश करून धुमाकूळ घातला. घरात झोपलेल्या धनसिंग टेकाम यांना हत्तींनी पायाखाली तुडविल्याने शरीर चेंदामेंदा झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय गावातील आठ घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

धुमाकूळ रोखा

लागून असलेल्या न्याहाकल, टीपागड परिसरातील शेतीचेही नुकसान केले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या गावातील काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या हत्तींनी गोंदिया जिल्ह्यातही चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा या कळपाने गडचिरोलीतील कोरची तालुक्यात प्रवेश केला आहे.

एकजण बालंबाल बचावला

या हत्तींनी यापूर्वी 21 ऑक्टोबर 2022 रोजी कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथे उभ्या पिकांची व घरांची नासधूस केली होती. त्यातच सनकुबाई कोलुराम नरेटी (80) ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याने तिचा जीव वाचला होता. 18 सप्टेंबर 2022 रोजी रानटी हत्ती पहायला जंगलात गेल्याने खड्ड्यात पडून हाड मोडल्याचीही घटना घडली होती. ज्ञानेश्वर शामराव गहाणे (45, रा. कुंभीटोला, ता. कुरखेडा), हे जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...