आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखी सुप्रभात:नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरामध्ये रोज राष्ट्रगीताने होते दिवसाच्या कामकाजाची सुरुवात

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या गावाची दैनंदिन व्यवहाराची सुरुवातच राष्ट्रगीताने होते, असे सांगितले तर नवल वाटेल. मात्र, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरामध्ये रोज राष्ट्रगीत गायनाने दैनंदिन कामकाजाची सुरुवात होते. राष्ट्रगीत सुरू होताच तेथील गावकरी सावधान स्थितीत उभे राहतात.

देशभक्तीपर गाण्याने सुरुवात...

राष्ट्रगीत सुरू होण्याआधी एखादे देशभक्तीपर गाणे वाजवून मुलचेरा गावात कार्यक्रमाची सुरुवात होते. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांआधी काही सेकंद देशभक्तीपर गाणे वाजवले जातात. घड्याळाचा काटा 8 वाजून 45 मिनिटांवर आल्यानंतर 'परेड सावधान... एक साथ राष्ट्रगीत सुरू कर' अशी सूचना येते आणि हा आवाज मुलचेरामध्ये जिथपर्यंत पोहोचतो तेथील गावकरी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीत सुरू करतात. यावेळी आजूबाजूची वाहनेही जागेवर थांबतात. राष्ट्रगीत संपल्या नंतर सगळे भारत माता की जय' असा जयघोष करत दिवसाची सुरूवात करतात.

15 ऑगस्टपासून सुरुवात

मुलचेरा पोलिस स्टेशन येथे काही महिन्यापूर्वी रुजू झालेले ठाणेदार अशोक भापकर यांनी 15 ऑगस्ट 2022 पासून या उपक्रमाला सुरुवात केली. 15 ऑगस्ट पूर्वीच त्यांनी याविषयी व्यापारी, युवा पिढी, तसेच पत्रकार बांधवांसोबत निसंकोच चर्चा करून सदर उपक्रमाला सुरुवात करण्याचे ठरवले होते. दररोज सकाळी राष्ट्रगीत गाण्याने जनतेमध्ये देशभक्ती वाढेल आणि समाजातही एकोपा निर्माण होईल या उद्देशाने सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले.

गावांमध्ये एकोपा वाढला

एखाद्या शाळेच्या किंवा हायस्कूलच्या परिपाठाप्रमाणे मुलचेरा गावाने हा उपक्रम 15 ऑगस्ट 2022 पासून अखंड चालू ठेवला आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून गावात भांडण तंटे कमी होऊन एकोपा वाढला आहे. तसेच गावातील लोकांची काम करण्याची क्षमता आणि उत्साह यामध्ये सुद्धा लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येते. मुलचेरा गाव हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत समाविष्ट असून या उपक्रमामुळे मुलचेरा गावाची लोकप्रियता वाढत आहे.

काय म्हणाले भापकर?

व्यापाऱ्यांच्या न्याय हक्काबरोबरच सामाजिक कामातही योगदान देण्याच्या हेतूने राष्ट्रगीताने दिवस सुरू करण्याचा उपक्रम राबविण्याची कल्पना मांडण्यात आली. एकमताने सर्वजण होकार दिल्याने 15 ऑगस्ट 2022 पासून हा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून व्यापारी वर्ग आणि येजा करणारे इतर नागरिक तालुका मुख्यालयातील मुख्य चौकात 52 सेकंद उभे राहतात. पोलिस स्टेशनच्या मोर्चाला लाऊडस्पीकर लावले असून दररोज 8 वाजून 45 मिनिटांनी राष्ट्रगीत झाल्यानंतरच सर्व व्यापारी वर्ग आपापली दुकाने उघडतात असे ठाणेदार अशोक भापकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...