आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावं ते नवलं, बाकड्यांवरून भांडण!:नागपूरमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेस आमदार अभिजित वंजारींमध्ये जुंपली

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या नागपुरात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्यात उद्यानात वा सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या बेंचवरील नावावरून जुंपली आहे. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी बाकड्यावरील आपले नाव खोडून स्वत:चे नाव लिहिल्याची तक्रार खोपडे यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात केली आहे. नावात काय आहे, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण, राजकारणांत नावातच सारे काही असते. कोनशीला अनावरण असो की एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन, तिथे नावावरून मानापमान नाट्य रंगते.

बेंचवरून नाव पुसले

शांतीनगर व प्रेमनगर भागात आमदार निधीतून लावण्यात आलेल्या बेंचेसवर पेंट मारून अभिजित वंजारी यांनी स्वत:चे नाव लिहिले आहे. या संबंधात झोन कंत्राटदारावर कारवाई केली जावी, अशी तक्रार खोपडे यांनी केली आहे. महापालिकेत बाक खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच दोन आमदारांमधील वाद समोर आला आहे. खोपडे यांनी वंजारी यांच्या सुचनेवरून बेंचवरील नाव पुसण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर अभिजित वंजारी यांनी खोपडेंचे आरोप फेटाळून लावले आहे. असले प्रकार आपण कधीही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

असे आहे प्रकरण

भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आमदार निधीतून शांतीनगर, प्रेमनगर भागात नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बाक लावले होते. त्यावर खोपडे यांचे नाव होते. मात्र, यापैकी काही बाकांवर रंग लावून खोपडे यांचे नाव पुसण्यात आले व त्यावर अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या खोपडेंनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. अभिजित वंजारी कांग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत. पक्षाने त्यांच्याकडे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली. खोपडे हे या मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. कांग्रेसला या मतदारसंघावर पुन्हा ताबा मिळवायचा आहे. त्यातून हा वाद उद्भवल्याचे बोलले जाते.

बातम्या आणखी आहेत...