आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात मुख्याध्यापकाच्या अपहरणाचे थरारनाट्य:मागितली 30 लाखांची खंडणी, नंतर पोलिसांच्या भीतीने दिले सोडून

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जरीपटका पोलिस ठाणे परिसरात राहाणाऱ्या मुख्याध्यापकाचे मानकापूर येथील एका खासगी हाॅस्पिटल समोरून शुक्रवारी मध्यरात्री अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. जरीपटका परिसरातील महात्मा गांधी शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मोतीरामानी यांचे अपहरण करण्यात आले.

एखाद्या चित्रपटात शाेभेल असे थरारनाट्य या प्रकरणात घडले. पोलिस आपल्यापर्यत पोहोचतील हे लक्षात येताच आरोपींनी अपहृत मोतीरामानी यांना स्वत:च सोडून दिल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

वैयक्तिक शत्रुत्व स्पष्ट

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मोतीरामानी यांना एका गाडीत बसवून नेण्यात आल्याचे दिसून आले होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासात लक्ष घातले. अपहृत मोतीरामानी आणि अपहरणकर्ते यांच्यात वैयक्तिक शत्रुत्व असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

लवकरच आरोपी गजाआड

आरोपी अजूनही ताब्यात आलेला नाही. पण, काही महिला आणि काही पुरूष यांचा यात सहभाग असल्याचे निदर्शनास आले होते. त्या दिशेने तपास सुरू केला. संशय असलेल्या नावांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले. लवकरच आरोपी गजाआड होतील असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

30 लाख तयार ठेवा

या प्रकरणात रात्र होऊनही वडील घरी न आल्याने मुलीने वडिलांना केलेला फोन अपहरणकर्त्यांनी उचलला व त्यांनी 30 लाखांची खंडणी मागितली. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार प्रदीप मोतीरामानी शुक्रवारी रात्री त्यांच्या दुचाकीवर बाहेर पडले. खूप रात्र होऊनही वडील घरी न परतल्याने मुलीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर अपहरणकर्त्यांनी उचलला. शनिवारी दुपारपर्यत 30 लाख तयार ठेवा. नाहीतर वडीलांना जीवंत पाहणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.

पोलिसही बुचकळ्यात पडले

यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी समाजातील ज्येष्ठांशी चर्चा केली. त्यांनी पोलिस तक्रार करण्यास सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी लागलीच पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला. रामानी यांची दुचाकी कामठी रोडवर स्थित एका हाॅस्पिटलसमोर उभी असलेली दिसली. यामुळे पोलिसही बुचकळ्यात पडले होते.

संचालकांचा सहभाग?

गावातल्या चर्चेनुसार रामानी मुख्याध्यापक असलेल्या शाळेच्या संचालकांशी त्यांचे पटत नव्हते. या शाळेच्या संचालकांना उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात रामानी यांनी संचालकाविरोधात बयाण दिले होते. पोलिस या दिशेनेही तपास करू शकतात असे बोलले जाते. तथापि वृत्त लिहीपर्यत शाळा संचालकांच्या सहभागाबाबत काहीही स्पष्ट झालेले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...