आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यात गेल्या पाच वर्षांत नक्षलींची भरती रोडावली, प्रमाण 85% वरून 40 टक्क्यांवर; 60% परराज्यांतील

हेमंत डोर्लीकर | गडचिरोली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील नक्षल भरतीतील महाराष्ट्राचा टक्का ५ वर्षांपूर्वी ८५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर घसरला आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व महाराष्ट्र केडरचा सचिव सह्याद्री ऊर्फ दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षलवाद्यांचा गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पोलिसांनी खात्मा केल्यानंतर नक्षलींचा प्रभाव ओसरल्याचे दिसते.

दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत नक्षलींकडून शहीद सप्ताह पाळण्यात येतो. यात पोलिसांवर हल्ले करणे व हल्ल्यात शहीद नक्षलींची स्मारके उभारण्याचा कार्यक्रम असतो. यंंदा अनेक वर्षांनंतर चकमकीशिवाय हा सप्ताह पार पडला. गडचिरोली-गोंदिया या नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील जिल्ह्यांसह छत्तीसगड व तेलंगणच्या सीमावर्ती भागातही नक्षलींना मोठ्या हिंसक कारवाया घडवून आणता आल्या नाही. बंदचे आवाहन फुसके ठरले.

नक्षलवादी कारवाया ठप्प
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवाया जवळजवळ ठप्प पडल्या आहेत. कोरची ते धानोरा या भागात नक्षली दलम उरले नाहीत. दक्षिण गडचिरोलीतील कारवाया नियंत्रणात आहेत. पोलिसांनी नक्षलवाद्यांपुढे आत्मसमर्पण, अटक आणि एन्काउंटर, हे तीन पर्याय ठेवले. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे. - अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली

पोलिस विरोधी कारवाया आ‍टोक्यात
२०१४ ते २०२० या ६ वर्षांत दरम्यान २१ पोलिस शहीद झाले, १५ च्या जवळपास सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला.
२००८ ते २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात ४ मोठ्या नक्षली हल्ल्यांमध्ये १०० च्या जवळपास जवान शहीद झाले होते.
१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडाजवळ केलेल्या स्फोटामध्ये १५ जवान व एक वाहनचालक नागरिक शहीद झाले होते. ही या पाच वर्षांतील सर्वात मोठी पोलिस हानी होती.

सामाजिक पोलिसिंगला यश
सामाजिक पोलिसिंगमुळे विश्वसनीयतेसह माहितीचे स्रोत वाढले, तर नक्षल्यांचे स्रोत घटले. २०२१ पासून गडचिरोली पोलिसांनी नागरिकांपर्यंत विकास योजना पोहोचवण्यासाठी "दादालोरा खिडकी' अर्थात ‘पोलिसदादाची खिडकी' उपक्रम सुरू केला. याद्वारे सव्वा लाख नागरिकांना प्रशासकीय सेवा पोहोचवल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे येथील तरुणांचा ओढाही नक्षलींपेक्षा शिक्षण व नोकरीच्या दिशेने वळला.

जिल्ह्यात ६०% नक्षली परराज्यांतील
जिल्ह्यातील ६०% नक्षली महाराष्ट्राबाहेरचे आहेत. ६ वर्षांपूर्वी हे प्रमाण १५% होते. पाच वर्षांत पोलिसांनी १९९ नक्षलवाद्यांना अटक केली असून १३७ नक्षल्यांना विविध चकमकीत ठार करण्यात आले. या काळात ९१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
-शहीद सप्ताहादरम्यान गडचिरोलीत आधीच्या काळात अशा प्रकारे शहीद नक्षलांची स्मारके बांधली जात होती. मात्र, यंदा अशा प्रकारचे एकही स्मारक बांधलेेले नाही.

तेलतुंबडेच्या खात्म्यानंतर नेटवर्क संपुष्टात
१३ नोव्हेंबर २०२१ रोजी मर्दिनटोला या अतिशय दुर्गम पहाडीवरील चकमकीत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सह्याद्री ऊर्फ दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांचा खात्मा झाला.

तेव्हापासून राज्यातील नक्षल्यांचे शहरी-ग्रामीण नेटवर्क संपुष्टात आले. तेलतुंबडे हा महाराष्ट्रातील नक्षलींच्या शहरी- ग्रामीण, सशस्त्र व बुद्धिजीवी, दलित व आदिवासी गटांचा समन्वयक होता. त्याच्या मृत्यूने राज्यातील नक्षलवाद खिळखिळा झाला. २०१५ नंतर गडचिरोलीतील सीमावर्ती व अतिदुर्गम भागात पोलिस मदत केंद्रे उभारली. बस्तरसह सीमावर्ती भागात पोलिस कॅम्प तयार झाल्यामुळे बस्तरमधून लीडरशिपचा प्रवाह आटला.

बातम्या आणखी आहेत...