आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे अपूर्ण:पंतप्रधानांच्या हस्ते होणारे ‘शांतीवन’ येथील संशोधन केंद्राचे लोकार्पण नासुप्रमुळे पुढे ढकलण्याची नामुष्की

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असणाऱ्या चिंचोली येथील शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गुरूवार १३ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने होणारे लोकार्पण कामे अपूर्ण राहिल्याने पुढे ढकलण्यात आले अशी माहिती भारतीय बौद्ध परिषदेचे कोषाध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.

केंद्रीय संसदीय कार्य व सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी पाटील यांना भ्रमणध्वनी करून कामे अपूर्ण असल्याने लोकार्पण करता येणार नसल्याचे सांगितले.

विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांकरिता निवासस्थाने आदी ८ इमारती उभारण्यात आल्या आहेत. लॅण्डस्केप, आनापान साती, उपासक गृह अशी किमान २०% कामे अपूर्ण आहे. विशेष म्हणजे अग्निशमनदलाची एनओसीही अजून मिळालेली नाही. केंद्राने यासाठी १७ कोटी दिले होते. त्यातून बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे काम पूर्ण झाले. मात्र राज्य सरकारने दिलेल्या ४० कोटीपैकी टप्प्याटप्प्याने ३२ कोटींचा निधी मिळाला. मात्र २० टक्के कामे अपूर्ण राहिली. केंद्राचे पैसे २०१६ मध्ये आले. आणि एप्रिल २०२३ मध्ये काम पूर्ण झाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सामाजिक सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वास्तु उभारण्यात आली आहे. १००८ वस्तुंच्या संग्रहासह या परिसरात वैशिष्टयपूर्ण वास्तुकलेतून विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांकरिता निवासस्थाने आदी ८ इमारती उभारण्यात आल्या आहेत. यापैकी संशोधन केंद्राच्या इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार होते.

बाबासाहेबांच्या वैयक्तिक वापरातील वस्तुंचे रासायनिक प्रक्रिया करून जतन व संरक्षण करण्यात आले आहे. यात देशाचे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी वापरलेले टाईप रायटर, बॅरिस्टर कोट, बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा समारंभातील बौद्ध मूर्ती, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तुंचा समावेश आहे.