आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामर्थ्य भारताचे:शत्रूच्या सीमेत घुसून 5 किमीमध्ये टेहळणी करणारा ड्रोन, DRDOच्या दालनातून दिसतेय संरक्षण सिद्धता

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले संरक्षण दल व त्याच्या वेगवेगळ्या शाखा अखंडपणे देश संरक्षणासाठी सज्ज असतात. मात्र ही सज्जता, सक्षमता आणि आक्रमकता येते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानातून. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (डीआरडीओ) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दालनाच्या सुरुवातीला आकर्षक ड्रोन ठेवण्यात आला आहे. पाच किलो वजनाचा हा ड्रोन शत्रूच्या सीमेत घुसून पाच किलोमिटर परीसरात टेहळणी करू शकतो. युद्ध काळात मानव विरहीत टेहळणी करणारा ड्रोन सध्या युद्धनीतीमध्ये माहिती गोळा करणारे यंत्र म्हणून प्रामुख्याने वापरल्या जाते. लग्नामध्ये शूटिंग करण्यासाठी, क्वचित प्रसंगी शहरात पोलिसांनी वापरलेला ड्रोन आपण बघितला असेल मात्र हा ड्रोन अधिक सक्षम असून त्यांच्या उच्च क्षमतेची माहिती या ठिकाणी मिळते.

याच दालनात अन्य एका स्टॉलवर "कन्फाईंड स्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल' नावाचे अद्भुत यंत्र आहे. हे यंत्र जमिनीवर कुठेही दडवलेले स्फोटक शोधून काढते. एवढेच नव्हे तर पायऱ्या चढून स्वतःच स्फोटके लपवलेली बॅग शोधू शकते. स्फोटक शोधणे, उचलणे, स्फोटक जिवंत आहे अथवा नाहीत याचे विश्लेषण करणे. वेळ नसेल तर त्याच ठिकाणी स्फोटक निकामी करते. अशा पद्धतीचे केवळ रिमोट वर चालणारे हे यंत्र असून अडचणीच्या ठिकाणी ठेवलेले स्फोटक शोधून काढण्याचे कौशल्य हे त्याचे वैशिष्टय आहे. मानवाच्या प्रतिकृतीत तसेच छोट्या खेळण्याच्या आकारात हे यंत्र लक्ष वेधून घेते.

समुद्राच्या तळाशी पाणबुडीच्या युद्धाचे अनेक चित्रपट आपण बघितले असतील. मात्र ‘सबमरीन सोनार सिस्टम’ काय असते, याची माहिती सगळ्यांना नाही. समुद्राच्या पोटात अनेक हालचाली होत असतात त्यांचे तांत्रिक विश्लेषण ही यंत्रणा करते. समुद्रात निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी वरून नेमके अंतर कसे काढायचे, त्याचे विश्लेषण कसे करायचे, या विश्लेषणाचे नेमकेपणा कसा असतो, याबाबतची माहिती या ठिकाणी दिली जाते. दिशा ठरवणे आणि अंतर ठरवणे अशी विभागणी सोनार सिस्टममध्ये केली असते. सैनिकी कारवाया, नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करताना हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जाते.

बातम्या आणखी आहेत...