आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लस:तिसऱ्या डोसचा आताच विचार करणे मूर्खपणाचे : डॉ. रमण गंगाखेडकर

नागपूर / अतुल पेठकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या देशात कमीत कमी ३२% लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर फक्त एकच डोस घेणारे २३% असून दोन्ही डोस घेणारे फक्त ९% आहे. असे असताना तिसऱ्या डोसचा आताच विचार करणे मूर्खपणाचे आहे, असे रोखठोक प्रतिपादन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य रोग विभागाचे निवृत्त वैज्ञानिक पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केले.

सीरमचे सायरस पूनावाला यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना कोविशील्डच्या दोन डोसनंतर तिसरा बुस्टर डोस घेणे आवश्यक असून आपणही तो घेतल्याचे प्रतिपादन केले होते. या नंतर सर्वत्र लस संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर डाॅ. रमण गंगाखेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यामुळे लस घेण्याबाबत आधीच उदासीन असलेले लोक आणखीच उदासीन होतील, असे सांगितले. कर्करोग असलेले व किमोथेरपीचे उपचार घेत असलेले, एचआयव्ही बाधित वा मधुमेह बळावलेल्या काही रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते, पाच सहा महिन्यांनंतर त्यांच्या शरीरातील प्रतिपिंडे कमी होतात अशा साधारणत: ६० वर्षांवरील व्यक्तींना तिसरा बुस्टर डोस देण्याचा विचार सुरू आहे. इतरांसाठी दोन डाेस पुरेसे आहेत. त्यामुळे तिसऱ्या डोसचा विचार करणे गैर असल्याची टीका डाॅ. गंगाखेडकर यांनी केली.

पहिला डाेस घेणारे फक्त २३ टक्के आहेत. अजूनही लोकांना लस मिळत नाही. अनेक ठिकाणी लस मिळत नसल्याने लसीकरण बंद ठेवावे लागते. लोकांना त्यात फारसा इंटरेस्ट राहिलेला नाही. ग्रामीण भागात तर उत्साहच दिसत नाही. त्यामुळे आधी कमीत कमी पहिला आणि दुसरा डोस देण्यालाच प्राधान्य दिले पाहिजे, असे डाॅ. गंगाखेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

क्लिनिकल ट्रायलशिवाय उत्तर मिळणार नाहीच
पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यायचा होता. ते अंतर आपण ८४ दिवस केले. तसा तिसरा घ्यावा लागल्यास किती दिवसांच्या अंतराने घ्यायचा, एकाच लसीचा घ्यायचा की मिश्र लसींचा घ्यायचा, त्याची खरच गरज आहे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे क्लिनिकल ट्रायल शिवाय मिळणार नाही. तोपर्यंत त्याची चर्चा करणेही गैर आहे. सगळ्यांना दोन डोस मिळाल्यानंतर गरज भासल्यास तिसऱ्याचा विचार करता येईल, असेही गंगाखेडकर यांनी या वेळी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता यावर गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागणार आहे.

दोन्ही डोस घेतल्यावरही डेल्टाचा धोका
दुसरी लाट ओसरत असली तरी पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यामुळे लोकांनी एकदम बेफिकीर न होता कोरोना प्राेटोकाॅलचे कसोशीने पालन करावे. नाही तर दोन्ही डोस घेतल्या नंतरही नवीन डेल्टा प्लसची लागण होऊ शकते. रुग्णसंख्या काही हजारांनी कमी झाली म्हणून बिनधास्त राहिल्यास परत धोका होऊ शकतो, असा इशारा डाॅ. गंगाखेडकर यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...