आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त:गडचिरोलीत दहशतवाद्यांप्रमाणे मुजाहिदीन तयार करायचे आहेत का? साईनाथच्या हत्येवर जन संघर्ष समितीचा सवाल

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या साईनाथ चौतूच्या हत्येनंतर गडचिरोलीत दहशदवाद्यांप्रमाणे मुजाहिद्दीन तयार करायचे आहेत का? असा सवाल विचारत जन संघर्ष समिती गडचिरोली जिल्हा प्रशासनावर संतापली आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन तसेच राजकारण्यांकडूनही साईनाथ याची उपेक्षा हेात असल्याने नागपूरचे संयोजक दत्ता शिर्के यांनी प्रशासनावर बोट ठेवले आहे.

काय आहे साईनाथ हत्या प्रकरण?

स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या साईनाथ चौतू नरोटी या 26 वर्षीय तरुणाची 8 मार्च 2023 रोजी नक्षल्यांनी गोळ्या घालून हत्या केली. चार भाऊ आणि दोन बहिणींमध्ये मधला असलेला साईनाथ हा अगदी प्रारंभीपासूनच अभ्यासू वृत्तीचा होता. त्याला अधिकारी व्हायचे होते आणि त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करीत होता. तो पोलिस भरतीतही सहभागी झाला होता. त्याचा रागही नक्षल्यांच्या मनात होता आणि म्हणूनच त्याला घरातून जंगलात नेऊन त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची निष्ठूर हत्या करण्यात आली.

प्रशासनाची दखल नाही

साईनाथची ही हत्या पोलिसांसाठी एक आव्हान आहे. मात्र, ते आव्हान स्विकारण्यास ते सज्ज असल्याचे दिसत नाही, असे शिर्के यांनी म्हटले आहे. पुन्हा एक साईनाथचा बळी जाऊ नये म्हणून या क्षेत्रात सांत्वना मोहिम राबवली जात नाही. शासन-प्रशासनाकडून कसलीही दखल घेतली जाताना दिसत नाही.

साईनाथची आई आजही त्याच्या आठवणीत धाय मोकलून रडत आहे. तिच्या अश्रूंचा बांध कधीचाच फुटला आहे. शासन व राजकारण्यांच्या रडावर साईनाथ हा कास्ट व्हिक्टिम नाही. तो राजकीय नेता म्हणा वा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. एक विद्यार्थी नक्षल्यांकडून अशा तऱ्हेने मारला जातो, त्याची साधी दखल घेऊन शासन यंत्रणा, राजकीय पक्षाचे पुढारी त्याच्या घरार्यंत सांत्वना देण्यासाठीही जात नाहीत.

मुजाहिदीन तयार होतील

एक लक्षात ठेवा, विद्यार्थी जेव्हा अशा तऱ्हेने मरत राहतील तर पुन्हा कधी विद्यार्थी तयार होणार नाहीत. त्यांच्याजागी दहशतवाद्यांप्रमाणे मुजाहिदीन तयार होण्यास सुरुवात होईल आणि मग पुन्हा एका नव्या संकटाचा सामना करण्यास भारताला सज्ज राहावे लागेल असा इशारा शिर्के यांनी दिला आहे.

नक्षली मोहिमेचा विजय?

साईनाथच्या हत्येचा निषेध व्यक्त करून झाल्यावर सारेच पुन्हा निद्रावस्थेत गेले आहेत. साईनाथला न्याय देण्यास सारेच असमर्थ दिसत आहेत. एका अर्थाने नक्षली मोहिमेचा हा विजयच म्हणावा का, असा प्रश्न शिर्के यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या हत्येला महिना होऊनही उदासीनता कायम आहे.

केवळ एकटी माय त्याच्या आठवणीत अजूनही अश्रू ढाळत आहे. साईनाथच्या हत्येच्या घटना अशाच घडत राहतील आणि समाज षंढासारखा कुंभकर्णी झोपेत राहणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.