आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी महाविकास आघाडीशी हातमिळवणी करीत पाठीत खंजीर खुपसला. विचारधारेला तिलांजली देत हिंदू सणांवर बंदी घातली, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
आता महाराष्ट्राची चौफेर प्रगती करणारे सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आले आहे. तर सर्वांगिण विकास करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. नक्राश्रू ढाळणारे कोण आणि आपल्या भल्याचा विचार करणारे कोण हे ओळखण्याची हीच वेळ आहे. भाजपाला विजयी करण्याची जबाबदारी आता तुमची आहे असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
भाजपाच्या विजयी संकल्प जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, चंद्रपूरचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, खासदार रामदास तडस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिनाने 3 लाख 75 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. "व्हायब्रंट गुजरात' प्रमाणे 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' योजना आणली आहे. भाजपाने देश, प्रदेश आणि गावपातळीवर विकासाची कथा कमळ चिन्हावर लिहिली. हा विजयी रथ चंद्रपूरच्या जनतेला समोर घेऊन जायचा आहे.
वीरता, शौर्यासाठी ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी डावलून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी महाविकास आघाडीशी हातमिळवणी करीत पाठीत खंजीर खूपसला. अनैसर्गिक आघाडी जास्त दिवस टिकत नाही. झालेही तसेच. विचारधारेला तिलांजली देत उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांवर बंदी घातली. महाविकास आघाडीचा जॉइंटली अॅक्वायरिंग मनी असा धंदा सुरू होता. डिलरशिप, ब्रोकेज व ट्रान्सफर हेच ते करीत होते. तर आमचे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर असे आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.
नड्डा यांनी दिला विश्वास
11 डिसेंबर 2022 रोजी मोदींनी नागपूर येथे 75 हजार कोटींच्या योजनांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मोदींनी केले. रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेत जाणे ही मोदींची संस्कृती आहे. जे केले तेच सांगितले आणि जे करणार असू तेच सांगू असा विश्वास नड्डा यांनी दिला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भातून 11 खासदार भाजपाचे निवडून येईल याची ग्वाही दिली. विदर्भासह आणि महाराष्ट्र नड्डा यांची स्वप्नपूर्ती करील, असे सांगितले. 2019 मध्ये चंद्रपूर लोकसभेची जागा निवडून येऊ शकली नाही याची खंत आहे. पण येणाऱ्या दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेसह सर्व निवडणुका भाजपाच जिंकेल अशी रिटर्न गिफ्ट देऊ अशी हमी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.