आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त वाढवला:मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला खोडा; सिंधुदुर्गात मनाई आदेश; एसआरपीएफला पाचारण

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप नेते राजन तेली यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. - Divya Marathi
भाजप नेते राजन तेली यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
  • पोलिस यंत्रणा झाली अधिक अलर्ट, राणे विरुद्ध सेना संघर्ष चिघळण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य आणि राणेंना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजपमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसआरपीएफची पोलिस कुमकही मागवण्यात आली असून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान, मनाई आदेशामुळे राणेंच्या यात्रेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ७ सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये राणेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली गेली. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राणेंच्या अटकेसाठी आंदोलने सुरू केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले व शिवसेनेने आंदोलन सुरू केले. त्यानंतर राणेंना संगमेश्वर येथे रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपने आंदोलन सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अधिक अलर्ट करण्यात आली आहे. जसिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध संघर्ष करून वाद निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलिस दलाची जादा पोलिस कुमकही बंदोबस्तासाठो तैनात करण्यात येत आहेत.

शिवसेनेशी युती होण्याचा प्रश्नच येत नाही : मुनगंटीवार
नारायण राणे यांना अटक केल्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध चांगलेच ताणले गेले असून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता शिवसेनेशी युती होण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र अाहेत. राणेंवर अटकेची कारवाई होणे चुकीचेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनाचा माेठेपणा दाखवून राणेंवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे आता भाजपचे इतर नेते काय म्हणतात ते पहावे लागेल.

अनिल परबांच्या चित्रफितीची सीबीआयकडून चौकशी करा - भाजप नेते ॲड आशिष शेलार यांची मागणी
ज्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झालेली नव्हती, तेव्हा राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना नेते व राज्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब रत्नागिरी जिल्हा पोलिसांवर दबाव आणत होते. त्याबाबतची ध्वनिचित्रफीत समोर आली असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाबाबत चुकीचा उल्लेख केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे क्षमायाचना करणार का, असा सवालही केला. शेलार म्हणाले की, राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब मंगळवारी ११ ते १ दरम्यान रत्नागिरी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत होते. त्यादरम्यान एका आयपीएस अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून राणे यांना अटक करण्यासंदर्भात आदेश देत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाली आहे.

गृहमंत्री नसतानाही अॅड. परब यांनी राणे यांच्या अटकेसाठी आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचेही या संवादातून दिसत आहे. अनिल परब गृह खात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. राणेप्रकरणी हेच अधोरेखित झाले आहे. परब यांचा गृह खात्यामधला हस्तक्षेप गंभीर आहे. म्हणूनच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज आहे. आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होता. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशीची गरज आहे. चंद्रकांत पाटलांना युतीची आशा शिवसेना-भाजप संघर्षानंतरही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युती होण्याची आशा व्यक्त केली आहे. २०१४ ला सेना-भाजपत अशीच कटुता आली होती. तरीही एकत्र आलो होतो, असे विधान पाटील यांनी केले आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाच्या तक्रारीत तथ्य असल्यास गुन्हा
शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य असल्यास कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही या वेळी पांडेय यांनी सांगितले.

जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली : राजन तेली
नारायण राणेंची बुधवारपासून सुरू होणारी तळकोकणातील जनआशीर्वाद यात्रा प्रदेश कार्यकारिणीकडून काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. ते सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यात मनाई आदेश असला तरी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज नाही. सिंधुदुर्ग हे राणेंचे होमपिच असल्याचे ते म्हणाले.

७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यानुसार जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या ३७(१) (अ) ते (फ) आणि ३७(३) प्रमाणे काल दि. २४ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६ वाजल्यापासून ते दि. ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. या काळात आक्षेपार्ह घोषणा करणे, जिल्ह्यात ५ किंवा पाचपेक्षा जादा लोकांनी एकत्र येण्यास मनाई आहे.

बातम्या आणखी आहेत...