आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानक्षलवादी चळवळीचे समर्थक समजले जाणारे कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्य शासनाचा अनुवादासाठीचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून नव्या वादाला ताेंड फुटण्याची शक्यता आहे.
कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीचे महत्त्वाचे नेते आहेत. कोबाड गांधी हे कानू सन्याल यांच्या नंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देणारे व आपले आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२०२०-२१ सालचे हे पुरस्कार आहे. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अशोक पंडित आणि लेखक रतन शारदा यांनी ट्विट करीत यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. या संदर्भात मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य
कोबाड गांधी हे माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही आहेत. देशात नक्षलवादी जाळे पसरवण्याच्या आरोपाखाली कोबाड गांधी यांना दिल्ली पोलिसांनी २००९ साली अटक केली होती. कोबाड गांधी हे कम्युनिस्ट विचाराचे आणि जातविरोधी कार्यकर्ते आहेत. त्यांनी दिल्ली, आंध्र प्रदेश आणि देशातील इतर अनेक तुरुंगांत माओवादाच्या आरोपाखाली एक दशक घालवले आहे. २००९ मध्ये जेव्हा त्यांना प्रथम अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्यावर ‘ज्येष्ठ माओवादी नेता’ असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आता न्यायालयाने त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. २०१९ च्या शेवटी ते तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या जीवनातील अनुभव लिहायला सुरुवात केली. साम्यवादाकडे त्यांचा असलेला कल, महाराष्ट्रात दलित पँथर्सची स्थापना, त्यांची दिवंगत जोडीदार अनुराधा गांधी आणि देशातील विविध तुरुंगातून झालेल्या शारीरिक हाल-अपेष्टा याबद्दल त्यांनी आपल्या पुस्तकात बरेच काही लिहिले आहे.
चौकशी अहवालानंतर कारवाई
मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहे. अहवालआल्या नंतर त्या नुसार याेग्य निर्णय घेऊ. पुरस्कार देण्यासाठी निवड समिती स्थापन केली जाते. ही समिती पुस्तकातील कंटेट तपासून घेते. पुस्तकात काही आक्षेपार्ह मजकूर असल्यास समितीने ही बाब माझ्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. इथे तसे झालेले नाही.
नक्षली विचारांचे उदात्तीकरण अमान्य
केसरकर म्हणाले, कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्राच्या अनुवादाला पुरस्कार दिला गेला, ही बाब अतिशय संवेदनशील आहे. विचार स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. असे असले तरी नक्षली विचारांचे उदात्तीकरण होणे आमच्या सरकारला मान्य नाही. आमच्याकरीता राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे काही चुकीचे असल्यास कारवाई केली जाईल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.