आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेरचा निरोप:शहीद जवान भूषण सतईला अखेरचा निरोप, आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रु अनावर

नागपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीरमधील गुजर सेक्टरमध्ये पाकिस्तान सैनिकांनी शस्र संधीचे उल्लंघन करून केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेले काटोल येथील शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर काटोल येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने काटोलवासीय उपस्थित होते. यावेळी मुलाचे अंत्यदर्शन घेताना सतई यांच्या आईने फोडलेल्या हंबरड्यामुळे साऱ्यांनाच गहीवरून आले होते.

शहीद भूषण सतईचे पार्थिव सोमवारी सकाळी १०.२५ ला त्याच्या फैलपुरा येथील घरी पोहोचले. शहीद भूषणला मानवंदना देण्याकरिता काटोल शहरातील नागरिक मोठया संख्येने एकत्र आले होते. पार्थिव घरी पोहोचताच घरच्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. नागरिकांनी ‘शहीद भूषण अमर रहे’ व ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. चिडलेल्या नागरिकांनी पाकिस्तान विरुध्द निषेधही नोंदवला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काटोल शहरातील मुख्य रस्त्यांनी अंत्ययात्रा काढण्यात आली. यात आबालवृद्धांचा व महिला भगिनींचा समावेश होता.

भूषणचे जाणे आई-वडीलांना धक्कादायक ठरेल, या भीतीपोटी त्यांना रविवारपर्यंत मृत्यूबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. भूषण दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झाला असून सुखरूप असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. अत्यंत जवळच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी बोलावून घेण्यात आले होते. गावातील समाज भवनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. सोमवारी सकाळी आईवडीलांना भूषणला वीरमरण आल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून त्यांचे अश्रु थांबत नव्हते.

परेड ग्राउंडवर अखेरची मानवंदना

शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राउंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली. राज्य शासनातर्फे राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी ब्रिगेडीयर संदीप कुमार, ब्रिगेडीयर दिपक शर्मा, कमांडर श्रीमती मनिषा काठे, कमांडर अलोक बेरी, आर. बी. बिराजदार यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.