आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्या ठार:चंद्रपूर जिल्ह्यात भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, झरण गावाजवळ रस्ता ओलांडताना घडला अपघात

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यात भरधाव येणाऱ्या वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर–आलापल्ली मार्गावरील झरण गावाजवळ हा अपघात झाल्याचे वन विभागाने सांगितले.

आज(शुक्रवार) सकाळी 8 च्या सुमारास या मार्गावरून चारचाकी वाहन भरधाव वेगााने येत होते. झरण गावाच्या अगदी जवळ रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला या चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या वाहनाचा शोध घेतला जात आहे.

चिंतेचे वातावरण

चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याच्या घटना नेहमी घडतात. यापूर्वी 2022 मध्ये नागपूर जिल्ह्यात अशा घटना घडल्याने पशुप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण होते. 2022 मध्ये नागपूर वन विभागाअंतर्गत देवलापार वनपरिक्षेत्र आणि रामटेक वन परिक्षेत्र येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

चिखलात फसून बिबटाचा मृत्यू

पहिल्या घटनेत पटगोवरी गावानजीक सर्वे क्रमांक 339 येथे चिखलात फसून बिबटाचा मृत्यू झाला. बिबट चिखलात फसलेला असताना नागपूर येथील रेस्क्यु पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.

वाहन अपघातात मृत्यू

दुसऱ्या घटनेत ८ सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजताच्या दरम्यान देवलपार वन परिक्षेत्र, मानेगाव क्षेत्रातील NH 44 जबलपूर नागपूर हायवे वर वाहन अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शिके नुसार दोन्ही बिबट्याचे शव विच्छेदन करण्यात आले.