आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूरची डाॅक्टर असलेली सुरभी मित्रा आणि पश्चिम बंगालच्या एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असलेली पारोमिता या दोघींनी काही दिवसांपूर्वी नागपुरात साक्षगंध केले. आता ते जीवनसाथी म्हणून सोबत राहणार आहेत. काेलकात्यातील एका कॉन्फरन्समध्ये जुळलेले बंध आता लग्नगाठीत बदलत आहेत. प्रेम करणाऱ्या दोन तरुणींना लग्नबंधनात अडकताना कुटुंबीयांचाही पाठिंबा मिळाला आहे. येत्या वर्षभरात दोघीही लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे दोघींनाही आई होण्याची इच्छा असून त्या मूल दत्तक घेण्याचा किंवा सरोगसीचा पर्याय निवडणार आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोघींनी प्रेमाविषयी सांगितले.
१९ वर्षांची असताना प्रथम वडिलांना सांगितले होते. त्या वेळी हे खूळ असेल, कालांतराने डोक्यातून निघून जाईल असे त्यांना वाटले, असे सुरभी मित्राने सांगितले. नंतर दोन वर्षांनी परत तेच सांगितले तेव्हा खूप न्यूट्रल रिअॅक्शन होती. वडील डाॅक्टर होते. त्यांनी याचा खूप अभ्यास केला, संदर्भ तपासले, अनेकांशी चर्चा केली. नंतर अगदी सहज ही गोष्ट स्वीकारली, असे सुरभीने सांगितले. आम्ही दोघींनी घरी एकमेकींसोबत राहण्याला कुणाचाच विरोध नव्हता. पण, नाते जगजाहीर कशाला करता, असा तिचा प्रश्न होता, असे सुरभीने सांगितले.
पारोमिताने केले प्रपोज :
सुरुवातीला बोलता-बोलता आवडी जुळल्या, मग पारोमिताने प्रपोज केले, असे सुरभीने सांगितले. सुरभीचा फोन सहा-सात दिवसांसाठी बंद होता. सात दिवसांनी तिचा मेसेज आला, तेव्हा पारोमिताने विचारले की ठीक आहेस ना. तिची काळजी आणि प्रेम सुरभीला जाणवले. ‘मी प्रपोज केलं, तर रिजेक्ट करशील का?’ असा प्रश्न पारोमिताने विचारला. त्यावर ‘मी असे का करेन?’ या उत्तराने सुरभीने अप्रत्यक्षरीत्या आपला होकार कळवला.
कॉन्फरन्समध्ये झाली ओळख
पारोमिता आणि सुरभीची भेट कोलकात्यात कॉन्फरन्समध्ये झाली. सुरुवातीला इन्स्टाग्राम आणि नंतर व्हॉट्सअॅपवर दोघींचे बोलणे झाले. आम्ही ऑगस्टमध्ये एंगेजमेंटचा निर्णय घेतला, मात्र त्याला कमिटमेंट सेरेमनी असे नाव द्यायचे ठरले. पारोमिता अकरावीत असताना २००३ मध्ये तिचे बाबा आणि बहिणीला तिच्याविषयी समजले. आईला आता सांगितले, मात्र तिचा विरोध नाही, असे पारोमिताने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.