आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजमितीला कोरोनाची दुसरी लाटच अजून कायम आहे. ती ओसरणे तर दूरच राहिले, अजून पीकवरही आलेली नसताना अकारण तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू करून भीती निर्माण करणे थांबवले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य रोग विभागाचे निवृत्त वैज्ञानिक पद्मश्री रमण गंगाखेडकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना केले. सध्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. साधारणत: १५ मेनंतर दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल, असे सांगितले जाते. पण, अजून त्याला वेळ आहे. ही लाट संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच वेळी ओसरणार नाही.
प्रत्येक ठिकाणी पीकवर जाण्याचा आणि ओसरण्याचा कालावधी वेगवेगळा राहणार आहे. असे असताना तिसऱ्या लाटेची भीती घालणे थांबवले पाहिजे, असे गंगाखेडकर म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्रीही तिसऱ्या लाटेची तयारी ठेवण्याविषयी बोलत आहेत. पण, अजून दुसरी लाटच ओसरायची आहे. एवढेच कशाला, अजूनही लाट पीकवर गेलेली नाही. आपण वैद्यकीय सेवा देण्यात अपुरे पडत आहोत. औषधे, प्राणवायू, खाटांची कमतरता आहे. असे असताना इतरत्र लक्ष वळवण्यासाठी असे मुद्दे चर्चेत आणले जातात, असे गंगाखेडकर म्हणाले.
स्टेराॅइडचा अतिरेक नको
स्टेराॅइडच्या अतिवापरामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. प्राणवायूची खूप गरज असलेल्या रुग्णालाच रेमडेसिविरची गरज असते. निदान झाल्याबरोबर रेमडेसिविर द्यायला नको. कारण त्यात स्टेरॉइड असते. तसे केल्याने प्रतिकारशक्ती कमी होते. इतर विषाणू वा जीवाणूचे हल्ले होऊ शकतात. त्यात रुग्ण दगावतो. म्हणून रेमडेसिविरचा अकारण उपयोग टाळला पाहिजे, असे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले. मागणी कमी झाली की रेमडेसिविरचे दर आपोआप कमी होतील. म्युकरमायक्रोसिस स्टेराॅडइमुळेच होतो.
कोरोना पीकवर नाही
अजूनही अनेक राज्यांत कोरोना टेस्टचा अॅक्सेस नाही. असे असतानाही टेस्ट पाॅझिटिव्हिटी रेट जास्त आहे. याचा अर्थ कोरोना पीकवर आहे, असे म्हणता येत नाही. डोंगर चढायला लागल्यावर सपाट प्रदेश दिसेपर्यंत डोंगर चढून पूर्ण झाला, असे म्हणता येत नाही. तसेच काेरोनाचे आहे. प्रत्येक ठिकाणची पीकची स्थिती वेगळी राहील. व्हॅक्सिनची उपलब्धता नाही, पाॅझिटिव्हिटी रेट जास्त आहे. मग लाटेचा पीक आला असे कसे म्हणणार, असा सवाल गंगाखेडकर यांनी केला. सर्वसाधारणपणे लाटा चार महिने चालतात. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे. अशात प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येकाने इतरांना भेटणे टाळले पाहिजे, असे ते म्हणाले.
म्युटंटमुळे कोरोना वाढीचा पुरावा नाही
कोरोनाचा विषाणू त्याची नवनवीन प्रतिरूपे तयार करतो. पण, या नव्या म्युटंटमुळे कोरोना वाढतो वा कमी होतो, याचा सबळ पुरावा आपल्याजवळ नाही. कारण त्याच्या नेमक्या परिणामाचा अजून अभ्यास झालेला नाही. त्यामुळे आपल्याजवळ अजून म्युटंटमुळे वाढतो आहे की नाही, याचा सबळ पुरावा नसल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.