आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वादविवाद:कृषी विधेयकांवरून काँग्रेसला उघडे पाडू, शिवसेनेची भूमिका गोंधळलेली; देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात टीका

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी बोलण्यापूर्वी जाहीरनामा वाचायला हवा होता - फडणवीस

केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून काँग्रेससह मित्रपक्षांनी शेतकऱ्यांची दिशाभूल चालवलेली आहे. काँग्रेसच्या या बेगडी शेतकरीप्रेमाला उघडे पाडून त्यांची लबाडी उघडकीस आणू, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात केली. शिवसेनेची भूमिका कायम गोंधळलेली असते, तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तोलूनमापून बोलावे, “सामना’त रोजच काही ना काही छापून येते, त्यांना ते छापावेच लागते. म्हणून त्यावर बोलले पाहिजे असे नाही, असेही ते म्हणाले.

या कायद्यामुळे लहान आणि मध्यम शेतकरी अधिक आत्मनिर्भर होतील. कारण आपल्या उत्पादनाची विक्री आणि किमतीसाठी त्यांना कृउबासवर अवलंबून राहावे लागणार नाही. याशिवाय शेतकरी आपल्या संभाव्य पिकाच्या विक्रीसाठी त्यांना हवे त्याच्याशी दर निश्चित करून शेतमाल विक्रीचा आगाऊ करार करू शकतील. तसेच इतर राज्यांतही शेतमाल विक्री करू शकतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यामुळे बिथरलेल्या काँग्रेसतर्फे सरकारला हमीभाव द्यायचा नाही, असे पसरवण्यात आले. मात्र, सरकार हमीभाव देणारच आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. २००६ मध्ये महाराष्ट्रात हा कायदा तयार झाला. त्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. खासगी एपीएमपीसीचा कायदाही आघाडी सरकार असताना लागू झाला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तसेच २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने कृषी विधेयकांतील सर्व आश्वासने दिली होती. राहुल गांधींनी यावर टीका केली. पण, तत्पूर्वी त्यांनी आपल्याच पक्षाचा जाहीरनामा वाचायला हवा होता, असा पलटवार त्यांनी केला. काही नेते दुकानदारी चालवण्यासाठी गैरसमज पसरवत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

गृहमंत्र्यांनी तोलूनमापून बोलावे

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न प्रयत्न केला, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे वर्तमानपत्रातून वाचले. नंतर त्यांनी अापण असे बोललो नाही. आपल्या तोंडी चुकीची वाक्ये घालण्यात आल्याचा खुलासा केला. एकवेळ त्यांना संशयाचा फायदा देता येईल. पण, गृहमंत्री अनिल देेशमुख यांनी ताेलूनमापून बोलले पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

फोन टॅपिंगचे अधिकार मुख्य सचिवांकडेच असतात

टेलिफोन टॅपिंगचे अधिकार गृहमंत्र्यांनी स्वत:कडे घेतल्याचेही वाचनात आले. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधात स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यामुळे टेलिफोन टॅपिंगचे अधिकार स्वत:कडे घेणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन ठरेल. गृहमंत्र्यांना त्याचा रिव्ह्यूही घेता येत नाही. तो अधिकार मुख्य सचिवांना आहे. त्यामुळे देशमुखांनी असे करू नये, असा सल्ला फडणवीसांनी दिला.