आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वाचा निर्णय:नागपुरात 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार कडक निर्बंध, पालकमंत्री नितीन राऊतांची माहिती

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.

राज्यभरातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. यामध्ये नागपूर शहर हे आघाडीवर आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि होळी सण लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागपुरात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 31 मार्चपर्यंत नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान या निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार विस्कळित होऊ नये याचीही योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. व्यापाऱ्यांसोबतही याविषयावर चर्चा करण्यात आली. 31 मार्चपर्यंत निर्बंध वाढवण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

लॉकडाउन जाहीर करुनही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रुग्णसंख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज 2,200 ते 3000 जवळपास रुग्ण आढळून येत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागपूर शहरात 31 मार्चपर्यंत निर्बंध वाढवण्यात आल्याची महिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

15 ते 21 मार्चपर्यंत नागपुरात लॉकडाऊन करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. पण कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने लॉकडाऊन ऐवजी निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

15मार्चला कोरोना बाधितांचा आकडा २००० च्या जवळपास होता. तो आज 3300 च्या जवळपास पोहोचला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मृतकांची संख्याही वाढत आहे. राज्यात 50 मृत्यू झाले असताना त्यांतील 30 एकट्या नागपुरातील आहे. परिणामी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नमुन्यांचा अहवाल मिळाला नाही
येथे घेतलेले नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. जेणेकरून नागपुरात फोफावत असलेला कोरोनाचा हा कोणता प्रकार आहे आणि कोठून आला आहे. पण दिल्लीच्या प्रयोगशाळेतून तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत कोरोनाचा धोका जास्त आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विनंती केली आहे की, त्यांनी तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळवून द्यावा. त्यावर येत्या दोन दिवसांत अहवाल मागवण्याची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.

गृहविलगीकरणातील रुग्ण वाढवताहेत प्रादुर्भाव
गृहविलगीकरणात असलेले कोरोनाचे रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. आधी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन कामाला लागले असून गृहविलगीकरणात असलेले लोक रस्त्यांवर फिरताना आढळल्यास त्यांची रवानगी थेट शासकीय विलगीकरण केंद्रात करण्यात येणार आहे. लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून स्वतःवर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...