आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणारा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरीत आहे. जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 च्या पंधरवड्यापर्यत या महामार्गावर एकूण 422 अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला. यात 22 पुरूष व 12 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश होता.
या शिवाय रोड हिप्नाॅसिसमुळे समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी सलग दोन तास गाडी न चालवता मार्गातील पेट्रोलपंपांवर थोडी विश्रांती घ्या आणि अधुनमधून साईड मिरर, डॅश बोर्ड, रिअर मिररकडे पाहा असा सल्ला महामार्ग पोलिसांनी माहिती अधिकारात दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.
नायट्रोजन गॅस भरलेले टायर उपयुक्त
अपघाताची शक्यता असल्याने समृद्धी महामार्गावर घासलेले टायर असलेली वाहने अडवण्यात येत आहे. या मार्गावर प्रवास करण्यासाठी नायट्रोजन गॅस भरलेले टायर उपयुक्त असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. येथे प्रवास करण्यासाठी चांगले टायर असणे आवश्यक आहे. हायवे हिप्नाॅसीस टाळण्यासाठी सलग दोन तास गाडी चालवू नका, समृद्धी महामार्ग पूर्व आणि पश्चिमेला असल्यामुळे सकाळ-संध्याकाळ सनवायझरचा उपयोग करावा अशा सूचना महामार्ग पोलिसांनी केल्या आहे.
महामार्ग पोलिसांच्या सूचना
पुरेशी झोप न झाल्यामुळे डुलकी लागून समृद्धीवर अपघात होतात. हे टाळण्यासाठी वाटेतील पेटोलपंपांवर वाहन थांबवून किंवा इंटरचेंजमधून वाहन बाहेर काढून तिथे विश्रांती घेऊनच प्रवास करावा, वन्यप्राण्यांची धडक बसू नये म्हणून रात्रीच्या वेळी १०० किमीपेक्षा जास्त वेग ठेवू नये, ओव्हरटेक तसेच लेन कटींग करू नये, वाहनाचे हेडलाईट, इंडिकेटर, वायपर, हाॅर्न व्यवस्थित सुरू आहे की नाही हे तपासून घ्यावे आदी सूचनाही महामार्ग पोलिसांनी केल्या आहे.
महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या 520 किमीच्या पहिल्या टप्प्याचे 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्या नंतर महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला. या महामार्गावरून केवळ महिनाभराच्या कालावधीत एकूण 3 लाख 54 हजार 283 वाहनांनी सुमारे 20 कोटी 2 लाखांची टोल दिला. टोल वसुली सुसाट असलेल्या समृद्धीवरून सुरक्षेचे उपाय मात्र पुचाट असल्याचे दिसून येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.