Maharashtra Assembly Winter Session Update | Winter Session Second Day | BJP Vs MVA Protest
थेट हिवाळी अधिवेशनातून:राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगला मोक्का लावा; विधानसभेत अजित पवारांची मागणी
नागपूरएका महिन्यापूर्वी
कॉपी लिंक
आज हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनीही आंदोलन केले. आंदोलनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. याविरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत. सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणले ही विरोधकांची ताकद आहे.
Live Update
पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते. या गँगची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली. राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करावी, त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने मागील सरकारच्या कामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृह 11.30 वाजता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदा 10 मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर सभागृह चारदा तहकूब झाले. वाचा सविस्तर
भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहेत. शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी आज नियम ९७ अन्वये सूचना मांडली. भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. वाचा सविस्तर
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर आज अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना खडेबोल सुनावले.
सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक सरकार अलमपट्टी धरणाची उंची वाढवत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारला मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका, असेही जयंत पाटलांनी राज्य सरकारला सुनावले.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेला हल्ल्याचा मुद्दा सभागृहात जयंत पाटील यांनी उपस्थित केला. जंयत पाटील म्हणाले, काल सीमाभागात मराठी बांधवांचे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचणार नाही, अशी व्यवस्था कर्नाटक सरकारने केली होती. माजी मंत्री हसन मुश्रीफ तेथील मराठी माणसांच्या समर्थनासाठी तिथे पोहोचले असता त्यांच्यावर लाठी उगारली गेली. हे अत्यंत चुकीचे आहे.
मुंबई महापालिकेच्या औषध खरेदीची चौकशी
मुंबई महापालिकेत यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. तसेच औषध दिरंगाई झाली, या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
मुंबईतील कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता. यावेळी अॅड. आशिष शेलार यांनी या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली, त्याची चौकशी करणार का? असे प्रश्न उपस्थितीत केले.
विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करताना.
मुंबईत 5 हजार आशा सेविकांची भरती
आशिष शेलार यांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच, आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे 5000 स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे 5500 आशा वर्कर्सची भरती करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
कांदिवलीतील पालिका रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
स्थगित विकास कामांवरून अजित पवारांची टीका
अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारने स्थगित केलेल्या कामांवरून सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांतील विकासकामांना खीळ बसली आहे. अधिवेशनात या कामांसाठी निधी मंजूर झाला होता. तरीही राज्यात नव्याने आलेल्या सरकारने या कामांना स्थगिती दिली.
अजित पवार म्हणाले, राज्यात मी अनेक सरकारे बघितली आहेत. अगदी नारायण राणेंपासून विरोधी गोटातील सरकार मी पाहीले आहे. मी देखील सात वेळेस निवडून आलो आहे. मात्र, असे कधीही बघितले नाही.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात महाविकास आघाडीची बैठक झाली. यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले.
अजित पवारांचा माईक बंद, विरोधकांची घोषणाबाजी
प्रश्नोत्तराचे हे सत्र असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांना थांबण्यास सांगितले. मात्र, अजित पवार बोलतच होते. त्यानंतर अजित पवार यांचा माईकच बंद झाल्याचे दिसले. यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरले व त्यांनी 'ईडी सरकार'च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी 'नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी', 'स्थगिती सरकार हाय हाय', '५० खोके एकदम ओके', अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.
तुमच्याकडूनच शिकलो, फडणवीसांचे प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार 7 वेळेस विधानसभेवर आले आहोत. ते आम्हाला ज्येष्ठ आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्याकडूनच हे शिकलो आहोत. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप आमदारांना निधी दिला गेला नाही. केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनाच निधी दिला. त्यामुळे आता आम्ही केवळ स्थगिती दिली आहे. सर्व आमदारांना विकासकामांना निधी दिला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही.
रोहित पवारांचा आरोप
रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर आरोप केला की, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मविआ सरकारने जागा निश्चित केली होती. पण, शिंदे सरकारने ही जागाच आता 99 वर्षांसाठी एका बिल्डरला 99 वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. तसेच, आंदोलनात सहभागी आदित्य ठाकरे यांनीही आरोप केला की, मुंबईतील मोकळ्या जागा, पर्यटकांसाठी आकर्षण असलेली स्थळेही शिंदे सरकारकडून बिल्डरांच्या घशात टाकली जात आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामकाज सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यात विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात व्यूहरचना ठरवण्यात आली.