आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक आणि महाराष्ट्रातील वाद दिवसेंदिवस पेटत चालला आहे. रविवारी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर आले. मात्र, विमानतळातून बाहेर निघण्याच्या मार्गावर असलेल्या मोक्याच्या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे होर्डींग लावण्यात आले. हे पोस्टर्स आता फाडण्यात आले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावल्याने मराठीजणांचा रोष उफाळून आल्याचे दिसून आले.
नेमके कसे आहे होर्डींग?
'सी कर्नाटका ए न्यू' असे कर्नाटक पर्यटन विभागाचे होर्डींग विमानतळावर लावले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पर्यटनमंत्री आनंद सिंग यांची छायाचित्रे असलेल्या होर्डीगवर 'अवर स्टेट मेनी प्राईड' असे घोषवाक्य लिहिलेले आहे.
वाद तापण्याची शक्यता
विमानतळाबाहेर अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेले कर्नाटक सरकारचे हे होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या गावातही सरकारचा पिच्छा सोडला नाही, अशी चर्चा रंगली आहे. तसेच, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर या होर्डींगमुळे राजकीय वातावरण तापण्याचीही चिन्हे आहे.
रोज नवा वाद
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केला आणि हा सीमावाद पुन्हा एकदा पेटला. महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी यावरून टीका केली. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा मुद्दा आणखी चर्चेत आला. बोम्मई रोज नवा वाद उभा करीत आहेत. अक्कलकोटमध्ये कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करीत बोम्मई यांनी वातावरण तापवले आहे. अशातच आता नागपूर विमानतळाबाहेरही कर्नाटकचे होर्डिंग्ज लावल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मराठी माणसांची फरफट
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न इतका गुंतागुतीचा बनला आहे की, सर्वोच्च न्यायालयाकडूनही या प्रकरणावर अद्याप तोडगा निघाला नाही. एवढेच नव्हे तर या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मध्यस्थी करावी लागली होती. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादात या सीमाभागातील मराठी माणसं मात्र भरडली जात आहे.
अजून सीमावादावर तोडगा नाही
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशके सुरू आहे. तो सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. त्या नंतरही वाद चिघळत चालला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या, सांगलीतील जवळपास 42 गावांवरही ताबा सांगितला आहे. वर्षे उलटली पण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तोडगा निघाला नाही. आंदोलने झाली, कितीदातरी दगडफेक झाली. पण अनेक वर्षांनंतरही हा वाद असाच कायम आहे आणि वेळोवेळी उफाळून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.