आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:कुपोषित मुलांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी, उपाययोजनांचा अहवाल राज्यपाल कार्यालयात 6 वर्षांपासून धूळ खात

अतुल पेठकर | नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कुपोषित मुलांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. कुपोषणावर राज्याला अजूनही मात करता आलेली नाही. अशा परिस्थितीत नागपूर येथील ख्यातनाम सुक्ष्मजीवशास्रज्ञ डाॅ. संजीव पाटणकर यांनी कुपोषणावर शोधलेला रामबाण उपाय राज्यपाल कार्यालयात सादर केलेल्या अहवालात “कुपोषित’ होऊन पडला आहे.

२०२१ मध्ये महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या ६ लाख १६ हजार होती. यापैकी अतिकुपोषित तब्बल ४ लाख ५८ हजार आहेत, तर १ लाख ५७ हजार बालके मध्यम कुपोषित आहेत. या स्थितीत डाॅ. पाटणकर यांनी आदिवासींच्या आंबीलमध्ये सहज विरघळेल अशा कडधान्याच्या डांबरगोळ्यांच्या आकाराच्या गोळ्या तयार केल्या. त्या आदिवासी क्षेत्रांत वाटल्या तर कुपोषण सहज दूर होईल म्हणून त्यांनी २०१४ मध्ये हा अहवाल राज्यपाल कार्यालयाला सादर केला. मात्र हा अहवाल धुळखात पडला आहे.

आंबीलमधील पोषणमूल्ये तपासून शोधला रामबाण
नंदुरबार, मेळघाट, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत कुपोषणामुळे मुलांचे अकाली मृत्यू होतात. यावर पाटणकर यांनी रामबाण उपाय शोधला. २००१ मध्ये विज्ञान, तंत्रज्ञान मंत्रालयाने डाॅ. पाटणकर यांचा प्रकल्प मंजूर केला. त्यांनी चंद्रपूर व गडचिरोलीत काेरपना, जीवती, भामरागड, कोरची आदी गावात अभ्यास केला. आदिवासी कोसरी, कुटकी, कोदो, हरक व मंडे आदी कडधान्यापासून केलेली आंबील पितात हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुर्गम भागांतून आंबील तसेच आदिवासींच्या रक्ताचे २५० नमुने संकलीत केले. आंबीलमध्ये असलेली पोषणमूल्ये आणि घटकांचा त्यांनी अभ्यास केला. त्यात प्रोटिन, खनिजे, व्हिटॅमिन-बी, मायक्रो आरगॅनिझम, रोगजंतू, बुरशी किती आहे याचे सखोल विश्लेषण केले. तसेच वजन, उंची, हिमोग्लोबीन आदीनुसार आदिवासींची माहिती ठेवली.

गोळ्यांनी तब्येतीत चांगली सुधारणा
काही ठिकाणी “व्हिटॅमीन बी-१२’ व “फोलिक अॅसिड’ची मात्रा जास्त तर काही ठिकाणी बीएमआय इंडेक्स उत्तम असायचा. यादरम्यान त्यांना “बॅसिलस बी-प्युमिलस’ हा बॅक्टेरिया आढळला. हा बॅक्टेरिया “व्हिटॅमीन बी-१२’ची निर्मिती करतो. याशिवाय “ल्युकोनाॅस्टाॅक’ हा आणखी एक बॅक्टेरिया आढळला. पाटणकर यांनी हे बॅक्टेरिया मिसळून गोळी तयार केली. यात कोसरी आणि तांदुळ प्रत्येकी ५०% होते. याद्वारे आदीवासींची तब्येत चांगलीच सुधारली. २०१४ मध्ये हा अहवाल त्यांनी सादर केला.

अॅनिमल हाऊसमुळे
डाॅ. पाटणकर यांनी २००१ ते २००६ दरम्यान सखोल संशोधन करत प्रयोग सिद्ध केला. मात्र माणसांवर उपयोग करण्यापूर्वी प्राण्यांवर प्रयोग करणे आवश्यक असते. इथेच पाटणकर यांच्या प्रयोगाचे घोडे अडले. तत्कालिन पर्यावरणमंत्री मनेका गांधी यांनी केलेल्या कडक नियमांमुळे प्रयोगासाठी अॅनिमल हाऊस आणि प्राणीच मिळाले नाहीत. परिणामी प्रयोग तिथेच थांबल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

अशा आहेत शिफारशी
अहवालात मिलेटस गोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या आदिवासी क्षेत्रांत वाटाव्यात, दुभाषांमार्फत त्यांना त्यांच्या भाषेत महत्त्व समजावून सांगावे, आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात, त्यांना प्रशिक्षण देऊन कोसरी, कुटकी, कोदो, हरक व मंडे आदी कडधान्याची शेती करण्यास प्रोत्यसाहन द्यावे, आदिवासी आणि आराेग्य विभागाने एकत्र काम करावे, अॅनिमल माॅडेल परिक्षणाची पद्धत सोपी करावी आणि त्यासाठी अनुदान दिले जावे, इत्यादी शिफारशी करण्यात आल्या आहेत.