आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी जयंती विशेष:​​​​​​​उपराजधानीत आहे महात्मा गांधींचे मंदिर, जयंतीदिनी अनुयायी करतात अहिंसेचा संकल्प

नागपूर (अतुल पेठकर)24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकातील मंगळूरू येथे गांधीजींचे एक खास मंदिर आहे.

महात्मा गांधींच्या हयातीत तयार झालेल्या त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नेताजी मार्केटमधील श्रीकृष्ण मंदिरात करण्यात आली आहे. काेरोनामुळे मूर्तीच्या भोवताली पारदर्शक काचेचे कॅबिनेट करायचे राहून गेले. ते या गांधी जयंतीनंतर केले जाईल, अशी माहिती सहयोग ट्रस्टचे संदेश सिंगलकर यांनी दिली.

१९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनावेळी गांधीजींच्या नागपुरातील अनुयायांनी त्यांची एक मूर्ती बनवून श्रीकृष्ण मंदिरात ठेवली होती. महात्मा गांधींची प्रेरणा सतत मिळावी, असा उद्देश त्यामागे होता. या मूर्तीपुढे त्या वेळी भजने व्हायची. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मूर्ती याच मंदिरात होती. मात्र, काही वर्षांनी मंदिराला आग लागली. त्यानंतर येथे श्रीकृष्णाचे नवे मंदिर बांधण्यात आले. मात्र, त्यात गांधीजींची मूर्ती नव्हती. काही अनुयायांनी मंदिरातील गांधींची मूर्ती कुठे गेली याबाबत चौकशी करीत या विषयाकडे पहिल्यांदा लक्ष वेधले. त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने ही मूर्ती परत मंदिरात आणून ठेवली.

मधल्या काळात (स्व.) उमेशबाबू चौबे यांनी या मूर्तीसाठी भरपूर प्रयत्न केले. गांधीजींचे एक कायमस्वरूपी स्मारक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र, पुढे काहीच झाले नाही आणि मूर्ती पुन्हा कुलूपबंद झाली. २०१९ मध्ये महाराष्ट्र गांधी स्मारक निधी नागपूरचे सचिव सुनील पाटील, सहयोग ट्रस्टचे संदेश सिंगलकर, अॅड. स्मिता सिंगलकर, डॉ. रवींद्र भुसारी, नरेश निमजे, निखिल भुते, मंदिराचे प्रमुख ताराचंद शर्मा यांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर मंदिरात दर्शनी भागात मूर्ती ठेवण्यात आली.

कर्नाटकातही आहे मंदिर
कर्नाटकातील मंगळूरू येथे गांधीजींचे एक खास मंदिर आहे. यामध्ये दररोज त्यांची पूजा केली जाते. महात्मा गांधींचे हे मंदिर मंगळूरूच्या श्री ब्रह्मा बैदरकला क्षेत्र गरोडी येथे बांधले गेले आहे. महात्मा गांधींचे अनेक अनुयायी या मंदिरात येतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्य आणि अहिंसा मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प करतात. १९४८ मध्ये या मंदिरात मातीची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. २००६ मध्ये लोकांच्या मागणीनुसार मंदिर बांधण्यात येऊन संगमरवरी पुतळा स्थापन केला.

भटारा येथेही आहे मंदिर
ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील भटारा गावातही महात्मा गांधींचे मंदिर आहे. या मंदिरात तांब्यापासून बनवलेली गांधीजींची ६ फूट उंच मूर्ती आहे. येथेही अनुयायी त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात.

बातम्या आणखी आहेत...