आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधी जयंती विशेष:​​​​​​​साधेपणाचा सिद्धांत आश्रमातच बंदिस्त; सेवाग्रामच्या कायापालटाची ‘पागल दौड’

सेवाग्राम, वर्धा18 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • खेड्याच्या पाऊलखुणा पुसत सेवाग्रामचा शहरासम ‘विकास’, चकाचक रस्ते, भव्य इमारतीतून ‘बापू’ हद्दपार

महेश जोशी | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला “साधेपणा’ आणि ‘खेड्याकडे चला’ हा विचार दिला. राज्यकर्त्यांनी याचा सोयीचा अर्थ घेत बापूंचे १० वर्षे निवास असणारे खेडे “सेवाग्राम’च्या शहरीकरणाचा चंग बांधला आहे. या खेड्याचा “कॉर्पाेरेट’ पद्धतीने कायापालट करताना चकाचक रस्ते, भव्य इमारती बांधून इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचे काम सुरू केले. अशा निरर्थक विकासाला बापूंनी “पागल दौड’असे म्हटले होते. बापूंचे विचार आश्रमातील ५ कुटीपुरते मर्यादित ठेवत सेवाग्रामचा कायापालट करण्याची “पागल दौड’च राज्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यावर गांधीवादी नाराज आहेत. गांधीजींचा १९३६ ते १९४६ दरम्यान सेवाग्राममध्ये निवास होता. बापूंच्या वर्धा जिल्ह्यातील आगमनाचे ७५ वर्षे आणि २०१९ मध्ये १५० वी जयंती साजरी करण्यासाठी २०१३ मध्ये राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने “गांधी फॉर टुमॉरो’ संकल्पना मांडली. नंतर आलेल्या भाजप सरकाराने प्रकल्पासाठी ४९० कोटी रुपयांचा निधी देत त्याचे “सेवाग्राम विकास आराखडा’ असे नामांतर केले. ऑक्टोबर २०१९ पर्यंत तो पूर्ण होणे अपेक्षीत होते. २०१९ मध्ये पुन्हा सत्तांतर होवून महाविकास आघाडी सरकार आले. त्यांनी भाजपच्या कामांना सुरू ठेवले. आश्रमाचे संचलन करणाऱ्या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानमध्ये बांधकामांबाबत मतभेद आहेत.

बापूंच्या साधेपणाला तिलांजली विकास आराखड्याचे काम मुंबईची आडारकर असोसिएट्स करत आहे. मूळ आश्रमातील आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, बापू दफ्तर आणि आखरी निवास वगळता संपूर्ण परिसराची नव्याने उभारणी सुरू आहे. यात सभागृह, यात्री निवास, शौचालये, व्हीआयपी कॉटेज, ऑडिटोरियम, पार्किंग लॉट, भूमिगत गटारे, सिमेंट रोड, अँपिथीएटर, नागपूर-सेवाग्राम मार्गावर सहा माहिती केंद्रे, मार्गदर्शक फलक, सुशोभित कमानी, धाम नदीवर घाट बनवने आदीचा समावेश आहे. पैकी ८० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. परंतू त्यातील चकचकीतपणा, भव्यता बापूंच्या साधेपणाच्या विरोधात असल्याचे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या माजी सदस्य आणि मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा विभा गुप्ता यांचे मत आहे.

ही पागल दौड निरर्थक विकासाला गांधीजी पागल दौड म्हणायचे. सरकार तेच करत आहे. बापू सांगायचे कमीत कमी संसाधानाचा वापर करा. पण सरकारला बांबू, लाकडे, माती ऐवजी लोखंड, सिमेंट, वीटामंध्ये रस आहे. त्यातूनच साकारलेल्या भव्य भिंती अबोल आहेत. त्यातून गांधी कसा समजणार? येथे गांधी शोधायला आलेल्या लोकांसाठी ८० वर्षे जुना विचार करावा लागेल. पण सरकारला इतिहासाच्या खाणाखुना नको आहेत. -विभा गुप्ता, अध्यक्ष, मगन संग्रहालय समिती

देशभरातील गांधीवादी मात्र नाराज, म्हणतात - आमचा आवाज क्षीण

यामुळे होतोय विरोध? नवीन कामासाठी जुन्या सुुस्थितीतील इमारती पाडणे, चौपदरी रस्त्यांसाठी १०० वर्षे जुन्या १२० झाडांची कत्तल, धाम नदीवर घाट बांधून चौपाटीसारखा विकास, चरखाच नसलेल्या चरखाघरात औद्योगिक वेस्टपासून बापू, विनोबांचे पुतळे उभारल्याने विराेध होत आहे. अर्धवट कामाचे उद्घाटन : २ ऑक्टोबर २०१९ च्या आधी म्हणजे गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मुख्यमंत्री ठाकरेंनी गेल्या ऑक्टोबरमध्ये अपूर्ण कामाचे ऑनलाइन उद्घाटन केले.

...म्हणून दिली परवानगी बापूंचे विचार पुढील १०० वर्षे जतन करण्यासाठी तशा वास्तूही लागतील. बांबू, मातीच्या इमारती किती दिवस टिकतील? नवी इमारत आश्रमाच्याच ताब्यात येणार आहे. यामुळे आश्रमाला हात न लावता बाहेरील कामांना परवानगी दिली. -टी.आर.एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान

बातम्या आणखी आहेत...