आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नाचे आमिष अन् फसवणूक ही काही नवीन गोष्ट नाही; पण फसवणूक पुरुषांची होत असेल तर..ही भलतीच भानगड होय ना..! एक फूल दो माली, असा प्रेमाचा त्रिकोण आपण पाहतोच पण, येथे चौकोण तयार झाला अन् दोन नव्हे तर तीन-तीन माली समोर आले. या प्रकाराची नागपुरात आता मोठी चर्चा रंगत आहे.
5 वर्षांत तीन विवाह
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसा प्रकार नागपुरात तीन व्यक्तींसोबत घडला. एका महिलेने आधी घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केले, नंतर स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला आणि आता ती तिसऱ्या व्यक्तीसोबत राहत आहे. इथपर्यंत ठिक, पण हे प्रकरण तेव्हा चर्चेत आले, जेव्हा महिलेचे दोन्ही पती तिसर्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसात पोहोचले. महिलेने फसवणूक करून 5 वर्षांत तीन लग्न केले. आता या महिलेवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
पहिल्या पतीपासून एक मुलगा
नागपूर पोलिसांच्या महिला भरोसा सेलच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा सुर्वे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी दोन लोक त्यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते. वाठोडा, नागपूर येथे राहणारा 25 वर्षीय धीरज गवंडीकाम करतो. काही वर्षांपूर्वी पूजा (नाव बदलले आहे) तिच्या बहिणीसोबत येथे आली आणि शेजारी राहणाऱ्या धीरजसोबत तिचे लग्न झाले. धीरज आणि पूजाला एक मुलगाही आहे.
मिस काॅल आला अन्...
पूजाच्या मोबाइलवर औरंगाबाद येथील पवन या 25 वर्षीय तरुणाचा मिस कॉल आला आणि दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. प्रेमसंवाद वाढला आणि काही महिन्यांनंतर पूजाने तिच्या पहिल्या पतीला सोडून पवनसोबत लग्न केले. पवनसोबत लग्न करण्यापूर्वी पूजाने स्वत:ला अविवाहित असल्याचे भासवले होते. पूजाने पवनला नागपूरला बोलावून त्याच्याशी मंदिरात लग्न केले. यानंतर पवनने नागपुरातच काम सुरू केले. पूजाने प्रथम पती धीरजला आपण गावी जात असल्याचे सांगून पवनसोबत ती पसार झाली.
दूसऱ्याला सोडून तिसर्याशी घरोबा
काही दिवसांनी पूजाची सचिन नावाच्या तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. तिचा दुसरा पती पवन घरी नसताना सचिन तिच्या घरी येवू लागला. महिलेचे सचिनवर प्रेम वाढले आणि तिने त्याच्याशी लग्न करण्यास होकार दिला. त्यानंतर दोघांनी पळून जाऊन लग्न केले आहे.
पूजाचा शोध घेताना दोन्ही पतींची भेट घडली
यानंतर पूजाचा पहिला पती धीरज आणि दुसरा पवन यांनी तिचा शोध सुरू केला, तेव्हा त्यांना समजले की पूजाने सचिन नावाच्या तरुणाशी लग्न केले आहे. यानंतर पत्नीला घेण्यासाठी दोघांनीही पोलिस ठाणे गाठले आणि नागपूर पोलिसांच्या 'भरोसा सेल'कडे दाद मागितली.
पूजा पत्नी असल्याचा तिघांचाही दावा
पूजाच्या पहिल्या पतीने सांगितले की, तिला आणि पूजाला एक मुलगा आहे. दुसरीकडे, पवन या दुसऱ्या पतीने तिच्या लग्नाचे फोटो आणि कागदपत्रे दाखवून ती आपलीच पत्नी असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी महिलेला फोन केला असता तिने सांगितले की, माझा तिसरा नवरा सचिनसोबत माझे आयुष्य चांगले चालले आहे. त्यामुळे आता पोलिसही संभ्रमात पडले की या प्रकरणात करायचे काय? पोलिस यातील मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.