आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:आत्मसमर्पित 16 नक्षलींसह 117 आदिवासी जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात लागले लग्‍न

नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली पोलिस दल, दादलोरा खिडकी यांच्या सहकार्याने अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह एकूण ११७ युवक-युवती विवाहबद्ध होणार आहेत. अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे व गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून नक्षलवादाने पोखरलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांना दहशतमुक्त व हिंसामुक्त जीवन जगता यावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेने हा जिल्हा दत्तक घेतला आहे. वर्षभर येथे रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, सामूहिक विवाह सोहळे इत्यादी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

१३ मार्च रोजी पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सोहळा प्रारंभ होणार आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक-अभियान सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, नागरी कृती शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक गंगाधर ढगे तसेच, सामाजिक कार्यकर्ते व गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथ कुंभारे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

आठ पालकत्व हिरावलेले : यावर्षी होत असलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण ११७ जोडप्यांचा विवाह होणार आहे. नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या १६ नक्षलवादी युवक-युवतींचा विवाह हे या समारोहाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. याशिवाय, यात सहभागी झालेल्या ८ मुलामुलींचे मातृ पितृ छत्र हरवलेले असून ४७ मुलामुलींना एकच पालक आहे.

सामूहिक विवाह सोहळ्याची वैशिष्ट्ये : आदिवासी परंपरेनुसार करणार लग्न, नवदाम्पत्याच्या माता-पित्यांना भेटवस्तू, नवदाम्पत्यांसह त्यांच्या १५ नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था, नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे व संसारोपयोगी साहित्य, नवदाम्पत्यांशी वर्षभर संपर्कात राहून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.

आदिवासी मुलींना घेतले दत्तक
गरीब आदिवासी कुटुंबातील मुलींचे विवाह करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी त्यांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन मैत्री परिवाराच्यावतीने करण्यात आले होते. दानदात्यांनी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आदिवासी मुलींच्या विवाहाचा खर्च उचलला. नवदाम्पत्याचे किमान एक वर्षभर पालनपोषण करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. या मुलामुलींना रोजगार उपलब्ध करून देण्याचाही संस्थेतर्फे प्रयत्न केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...