आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचलती फिरती आंखो से अजा देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी है, माँ देखी है अशा नेमक्या भावना मुनव्वर राणा यांनी आईबद्दल व्यक्त केल्या आहेत. आई यापेक्षा काय वेगळी असते. आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृती जपण्यासाठी एका आईने त्याच्या वाढदिवशी रक्तदान शिबिर घेतले आणि त्याच्या भावाने दिवंगत भावाच्या २० हजार झाडे लावण्याच्या इच्छेखातर त्याचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित दोन हजार झाडे लावली. ही झाडे वाढून मोठी होतील तेव्हा त्यातून इब्राहिम पठाण वाऱ्याची झुळूक होऊन सर्वांना दुवासलाम करील ही कुटुंबीयांची भावना.
३१ जुलै २०२१ रोजी डेंग्यूमुळे १६ वर्षीय इब्राहिमचा मृत्यू झाला. त्याच्या वाढदिवशी नुकतेच त्याची आई बुशरा हसन पठाणने नागपूर येथील डाॅ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेतले. इब्राहिम जात्याच हुशार होता. २०१९ मध्ये अमेरिकेतील कार्यक्रमाकरिता स्काऊट गाइडमधून त्याची भारतीय चमूत निवड झाली होती. अमेरिकेत २४ वर्ल्ड जंभिरी स्काऊट गाइडमध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. बुशरा पठाण यांच्या शिक्षण संस्थेत माजी सैनिकांच्या मुलांना मोफत, तर शेतकऱ्यांच्या मुलांना सवलतीच्या शुल्कात शिकवले जाते.
अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील पठाण कुटुंबीय समाजकारण आणि शिक्षण कार्यात अग्रेसर आहे. इब्राहिमचे वडील हसन पठाण हे माजी सैनिक आहेत. आई बुशरा या एमए, बीएड आहेत. त्या आॅल इंडिया मुस्लिम वुमन सोशल वेल्फेअर अॅँड एज्युकेशन असोसिएशन ही संस्था चालवतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे त्यांनी उर्दूत भाषांतर केले आहे. इब्राहिमने आई-वडिलांकडून समाजकारणाचा वसा घेतला. त्याने झाडे लावण्यासाठी स्वत:ची आय फाउंडेशन संस्था स्थापन केली होती.
संकल्पपूर्तीचा निश्चय
५ जून २०२१ रोजी इब्राहिमने २० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यापैकी १८ हजार झाडे लावलीही. उजाड माळरानावर मोकळ्या जागेत फिरताना त्याला डेंग्यू झाला. नागपूर येथे उपचार सुरू असताना ३१ जुलै २०२१ रोजी त्याचा मृत्यू झाला. यातून सावरत लहान भाऊ ताहेरने वृक्ष लागवडीचा भावाचा संकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि उर्वरित दोन हजार झाडे लावून तो पूर्णही केला. ही झाडे मोठी होऊन वाऱ्यावर डोलतील तेव्हा त्यातून इब्राहिमच्या आठवणीही डोलत राहतील, अशी या कुटुंबाची भावना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.