आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांमध्ये कोरोना:90 ते 95 टक्के मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे, लवकरच कृतिदलाची बैठक

अतुल पेठकर | नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालकांना क्वचित भासते रेमडेसिविर इंजेक्शनची गरज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक प्रभावित हाेतील, असा अंदाज असला तरी ९० ते ९५ टक्के मुलांमध्ये कोरोनाची सौम्य तसेच साधारण लक्षणे आढळून येतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही, अशी दिलासादायक माहिती इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिकचे माजी अध्यक्ष डाॅ. बकुल पारेख यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. मोठ्यांपासून लहानांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मोठ्यांनी लहानांना जपावे, असा सल्लाही डाॅ. पारेख यांनी दिला.

लहान मुलांवरील कोराेना उपचाराचा कृती आराखडा ठरवण्यासाठी स्थापन केलेल्या कृतिदलाने औषधोपचाराचा आराखडा तयार केला आहे. येत्या दोन दिवसांत कृतिदलाची बैठक आयोजित केली आहे. तिसरी लाट येईलच असे नाही. परंतु आम्ही येईल असे गृहीत धरून तयारी केली आहे. आमची तयारी वाया गेल्यास आनंदच आहे, असे डाॅ. पारेख यांनी सांगितले.

मोठ्यांनीही काळजी घ्यावी : लहान मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचा मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा नवा आजार मुलांमध्ये कोरोनानंतर साधारणत: महिनाभरानंतर दिसून येतो. ताप येणे, पुरळ येणे, डोळे व ओठ लाल होणे, दम लागणे, उलटी होणे ही त्याची लक्षणे असल्याची माहिती कृतिदलाचे सदस्य ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ डाॅ. विजय येवले यांनी दिली. लहानांना संसर्ग होऊ नये याची काळजी मोठ्यांनीही घ्यावी, असे डाॅ. येवले यांनी सांगितले.

बालकांना क्वचित भासते रेमडेसिविर इंजेक्शनची गरज
क्वचितच लहान मुलाना मोठ्यांसारखा न्यूमोनिया होतो. म्हणून रेमडेसिविर वा टाॅसिलाॅमीझुमॅबसारखी औषधे क्वचितच लागतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ती देऊ नये, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. मोठ्यांना लागणारे प्रत्येक इंजेक्शन, औषधे लहानांना लागत नाहीत. गरज आहे की नाही, हे तपासूनच लहानांना औषधे दिली जातील, असे डाॅ. पारेख यांनी सांगितले. १०० पैकी १० मुलांमध्ये या नव्या मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणे दिसतात. त्यापैकी एकाला अॅडमिट व्हावे लागते. त्यापैकी ३ वा ५ टक्के मुलांना व्हेंटिलेटर लागते. लहान मुलांना पॅरासिटीमाॅल वा तत्सम औषधे दिली जाऊ शकतात. रेमडेसिविर वा इतर अँटिबायोटिक खूप गरज असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच दिली जातील, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...