आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोलेबाजी:'ज्याला सोडतो तेली, तो नेहमीच होतो खाली'; मंत्री विजय वडेट्टीवार यांची बावनकुळेंच्या तिकीट कापण्यावरून टोलेबाजी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपने चंद्रशेखर बावनकुळेंचे तिकीट कापले नसते तर भाजपचे 15-20 आमदार जास्त निवडून आले असते

काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार आक्रमक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मनात असेल ते रोखठोक बोलणे त्यांना आवडते. शुक्रवारी नागपुरातील एका कार्यक्रमात वडेट्टीवारांच्या फटकेबाजीने हास्याचे षटकार उडाले. वडेट्टीवारांबरोबर या वेळी व्यासपीठावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. हीच संधी साधून वडेट्टीवारांनी बावनकुळेंच्या तिकीट कापण्यावरून तुफान टोलेबाजी केली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाच्या कार्यक्रमात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाने कार्यक्रमात रंगत आणली.

बावनकुळेंचे तिकीट कापणाऱ्यांचे आभार :

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले. यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. याच प्रसंगाची आठवण काढत वडेट्टीवारांनी टोलेबाजी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांचे तसेच त्यांचे तिकीट कापणाऱ्यांचे आभार मानले पाहिजे. नाहीतर विजय वडेट्टीवार मंत्री झाले नसते, असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजपने चंद्रशेखर बावनकुळेंचे तिकीट कापले नसते तर भाजपचे १५-२० आमदार जास्त निवडून आले असते. आता भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यात १० किंवा १५ आमदार वाढले असते तर भाजप आमदारांची संख्या १२० वर गेली असती, असा चिमटा वडेट्टीवारांनी काढला. “ज्याच्या मागे तेली, ज्याच्यासोबत तेली आणि ज्याला सोडतो तेली तो नेहमीच होतो खाली,’ असे म्हणत वडेट्टीवारांनी तेली समाजाच्या ताकदीचा परिचय दिला. भाषण संपताना शेवटी त्यांनी बावनकुळेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.