आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे या भाजपच्या एकेकाळच्या घनिष्ठ सहकाऱ्यांमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शह-काटशहाचे डाव रंगले. भाजप आमदारांनी नाथाभाऊंना सभागृह कामकाजाच्या नियमांचे तांत्रिक कारण पुढे करत बोलण्यापासून रोखले. फडणवीस अन् खडसे या कट्टर विरोधकांमधील शीतयुद्ध संपलेले नाही, हे सभागृहात आज स्पष्ट झाले. पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत बेळगाव सीमाप्रश्नी काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर दानवे, काँग्रेसचे अभिजित वंजारी, शेकापचे भाई जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी विचार मांडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन करण्यास उभे राहिले. विरोधी बाकावर पहिल्या रांगेत बसलेले एकनाथ खडसे उठले आणि मला अर्धा मिनिट बोलायचे आहे असे म्हणत उभे राहिले. भाऊ उठल्याने फडणवीस वैतागून खाली बसले. त्यांच्या मागे बसलेले भाजप आमदार प्रवीण दरेकर उठले आणि खडसे यांना बोलू दिल्यास आमच्याकडून ४ जण बोलतील, असा इशारा उपसभापतींना दिला. खडसे उभे होते. ते बोलू देण्याची उपसभापती यांना मागणी करत होते. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील उभे राहिले, सभापती महोदय..दोघे बोलणार हे आपले ठरले हाेते. तुम्ही चार लोकांना संधी दिली. परत नाथाभाऊंना बोलू देत आहात, काय चालले आहे? त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कठोर भूमिका घेत, नाथाभाऊ तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, खाली बसा, अशी विनंती केली. मला पॉइंट आॅफ इन्फर्मेशन मांडायचा आहे, देत नसाल तर बसतो म्हणत ते बसले. त्यानंतर सभागृहात विधेयके, अध्यादेश मांडण्यात आली. त्यावर नाथाभाऊ परत उठले अन् म्हणाले, मला अध्यादेशची प्रत मिळेल काय? त्यावर बंदरे मंत्री दादा भुसे गडबडले. लगेच फडणवीस उठले आणि म्हणाले, भाऊ, विधेयकाची प्रत सभागृहात दिली जाते. पण, अध्यादेश प्रख्यापित (जाहीर) असताे. तो दिला जात नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.