आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गाच्या कामात दुय्यम दर्जाचे स्टील, सिमेंट आणि डस्ट वापरण्यात आली आहे. त्यामुळे हा महामार्ग निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या महामार्गाची लाइफ ५० वर्षे कमी होईल, असा आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही आमदार गोरंट्याल यांनी केली. मी खोटं बोलत असेल तर उद्याच राजीनामा देतो, असा इशाराही आमदार गोरंट्याल यांनी दिला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात आमदार गोरंट्याल यांनी जालना नगरपालिकेच्या संदर्भात प्रश्न मांडले. जालना शहर वर्षाला शंभर कोटींहून अधिक जीएसटीची रक्कम भरते. त्यापैकी २५ टक्के रक्कम जालना नगरपालिकेला सहायक अनुदान म्हणून देण्याची मागणी त्यांनी केली. वेगवेगळ्या समस्या मांडत असताना त्यांनी समृद्धी महामार्गासाठी दुय्यम दर्जाचे स्टील, सिमेंट आणि डस्ट वापरण्यात आल्याचा आरोप केला. हा महामार्ग शंभर वर्षे टिकणे अपेक्षित होते, मात्र दुय्यम दर्जाचे साहित्य वापरल्याने त्याचे आयुष्य ५० वर्षांपेक्षा जास्त असणार नाही आणि भविष्यात पूल पडू शकतात, असा धोका आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केला. आमदार गोरंट्याल हा आरोप करत असताना काही सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी ज्या भागातून येतो तिथे स्टील तयार होते. त्यामुळे मला याची पूर्ण कल्पना आहे. समृद्धीसाठी दुय्यम दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप त्यांनी तीन वेळा केला.
अर्जुन खोतकरांवर निशाणा; नसता राजीनाम्यास तयार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. असले तरी त्यापूर्वीच दसरा मेळाव्यासाठी काही लोकांनी ४०० वाहने या रस्त्यावरून पळवली. तेव्हा अपघातात १२ वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे हे लोक कोण होते त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार गोरंट्याल यांनी केली, तर दुसरीकडे जे गुवाहाटीला गेले त्यांना खोके मिळाले आणि जे रडत-रडत शिंदे गटात गेले त्यांना नागपूरपासून शिर्डीपर्यंत टोलनाके मिळाले, असा उल्लेख करताना आमदार गोरंट्याल यांनी खोतकर यांचा नामोल्लेख केला. मी खोटं बोलत असेल तर उद्या सकाळीच राजीनामा देईन, असे म्हणत गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर आरोप केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.