आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील अस्थिर परिस्थितीतही काही लोक स्थिर मनाने शासन निर्णय जारी करीत याही परिस्थितीत पैसे कमावण्याचे उद्योग करीत आहेत, अशी शंका आल्याने राज्यपालांना भाजपाने पत्र दिल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी आले असता ते बोलत होते.
राज्यपालांना एखादा पक्ष वा समूहाकडून एखादे निवेदन वा पत्र दिल्यानंतर त्या संदर्भातील माहिती मागवणे हे त्यांचे कर्तव्य असते. याचा अर्थ राज्यपालांनी आक्षेप घेतला वा चुकीचे केले असा होत नाही. राज्यपालांनी 22 ते 24 जून दरम्यान काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती मागवण्यात चूक नाही असे मुनगंटीवार म्हणाले. कोणत्याही पत्राच्या संदर्भात प्रशासनाकडून माहिती वा खुलासा करून घेणे हे राज्यपालांचे कर्तव्यच आहे.
राऊतांचे मन चंचल
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या संवादाविषयी आपल्याला माहिती नाही. ती तुम्हाला संजय राऊतांकडून घ्यावी लागेल, असे मुनगंटीवार म्हणाले. राऊतांच्या म्हणण्यावर आता बोलावे असे काही नाही. राज्यातील अस्थिरता जसजशी वाढत जाईल तसतशे राऊतांचे मन चंचल व अस्थिर होईल. अस्थिर मनाने ते काय बोलतील याचा भरवसा नाही. म्हणून राज्यात अस्थिर वातावरण असेपर्यत डबके, रेडे, वराह असे नवनवीन शब्द ऐकू येत राहिल. "वेट अॅण्ड वॉच' ची भूमिका आवश्यकता असेल तेवढे दिवस राहिल. भाजपाला कोणतीच घाई नाही, असे ते म्हणाले.
सामना शिवसेनेचे पॉम्पलेट
मुनगंटीवार म्हणाले की, राज्यपालांनी सरकारला विश्वासमत सिद्ध करण्यासाठी बोलावले पाहिजे अशी मागणी होत आहे. या संदर्भात महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे. आपल्याकडे बहुमत आहे की नाही हे त्यांनी समजून घ्यावे. आणि त्यांनीच जनहिताचा योग्य निर्णय करावा, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सामना हे शिवसेनेचे 'पॉम्पलेट' आहे. त्यामुळे सामनातून काय लिहून येते त्या संदर्भात फार बोलणे हे खप वाढवण्याचा प्रकार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.