आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद वार्ता:विदर्भामध्ये मान्सूनचे आगमन, 19 जूनचा वर्तवला होता अंदाज, तत्पूर्वीच मान्सून दाखल झाल्याचे जाहीर

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून विदर्भात गुरुवार १६ जून रोजी दाखल झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. १५ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. म्हणून विदर्भात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या वैदर्भीयांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही सुखद वार्ता आहे.

महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पाऊस सरी काेसळत असताना नागपूरसह विदर्भात अजूनही गरमी आणि उकाडा होता. त्यामुळे वैदर्भीय पावसाची चातकासारखी वाट पाहात होते. प्रादेशिक हवामान खात्याने यापूर्वी विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजे १९ जूनपासून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र तत्पूर्वीच मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले आहे.

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात राज्य, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग, संपूर्ण तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग आणि दक्षिण ओडिशा, बहुतांश भागात पुढे सरकला आहे. कोस्टल आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराचे आणखी काही भागात गुरुवार, १६ जून रोजी दाखल झाला आहे.

उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य, मध्य प्रदेश, विदर्भाचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेश आणि पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, काही भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, उप हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि बिहारचा आणखी काही भाग, पूर्व उत्तर प्रदेशचा काही भागात पुढील २-३ दिवसांत सक्रिय होईल.

बार्शीटाकळीत सर्वाधिक पाऊस ः अकोला जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसाची एका दिवसात ४.८ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ११.७ मिमी पाऊस हा बार्शीटाकळी तालुक्यात झाला आहे.

७५ मिमी पाऊस पडल्यानंतरच सोयाबीन पेरण्यास प्राधान्य द्यावे यवतमाळ जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अाता मान्सूनची एन्ट्रीसुद्धा झाली आहे. मात्र, आणखी चार दिवस जिल्ह्यात सर्वदूर मान्सून सक्रीय होणार नाही. तेव्हा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ७५ मीमी पावसानंतरच सोयाबीन पेरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील पेरण्या लांबल्या
यंदा मान्सून लवकर येणार असा हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज सपशेल फोल ठरला आहे. कारण १५ जून पर्यंतही जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस आला नाही. दरम्यान, गुरुवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास मान्सूनच्या वाऱ्याने सर्वदूर जिल्हा व्यापला. मात्र, मान्सूनच्या पावसाला उशिर झाल्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील पेरण्या लांबल्या आहेत. त्याचा फटका उडीद, मुगाला बसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...