आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंघ शाखा प्रत्येक जात, धर्म आणि पंथाकरिता खुली आहे. तशीच ती मुस्लिमांकरिताही खुली आहे. मुस्लिम बांधव संघाशी जुळत असल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना मांडली. मुस्लिम वस्त्यांमध्ये संघ शाखा सुरू करण्यात येईल, असे सरसंघचालक कुठेही बोलले नाहीत. बहुतेक कुणीतरी खोडसाळपणाने हे वृत्त पसरवले आहे. येणाऱ्या तीन वर्षांत शहरांत, प्रत्येक वस्तीत आणि ग्रामीण भागात प्रत्येक मंडळात संघ शाखा सुरू करण्याची योजना आहे. त्यात इतरांप्रमाणे मुस्लिमांचेही स्वागतच आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
संघ शाखेत मुस्लिम दिसत नाहीत, याकडे लक्ष वेधले असता, संघ शाखेत जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद कधीच केला जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने गणना होत नाही. स्वयंसेवक हा स्वयंसेवकच असतो, असे ठाकूर यांनी सांगितले. संघ शाखा सर्वांकरिता खुली आहे, याचा पुनरुच्चार ठाकूर यांनी केला. आजच्या घडीला कदाचित संख्येने कमी दिसत असला तरी अनेक ठिकाणी मुस्लिम समुदाय संघाशी जुळलेला आहे. आमच्याकडून सातत्याने संपर्क आणि संवाद साधून गैरसमज दूर केले जातात.
संघाला पारखून नि समजून घ्या
केवळ मुस्लिमच नव्हे तर संघापासून अंतर राखून असणाऱ्या वा संघाविषयी गैरसमज असणाऱ्या प्रत्येकाने संघात येऊन संघाचे काम पाहावे, संघ समजून नि पारखून घ्यावा आणि पटले तर संघाशी जुळावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव संघाशी जुळलेले आहेत. पण आम्ही त्याचा प्रचार करीत नाही. समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याचे आमचे प्रयत्न सुरूच असतात. आजच्या घडीला देशात मैदानात २७ हजार २०० संघ शाखा लागतात. १२ हजार ३०० ई-शाखा आहेत. ६५१० साप्ताहिक मीलन, ३,६०० ई-मीलन आणि ९,६५० परिवार मीलन शाखा सुरू आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.