आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दोन दिवसांच्या बाळाला फरशीवर आपटल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. दरम्यान या प्रकरणी बाळाच्या वडिलांना अजनी पोलिसांनी अटक केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी घडलेली ही घटना 1 जानेवारी 2023रोजी उघडकीस आली.
बाळाला दुखापत
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रतीक्षा गिरीश गोडाणे (वय 25) ही मेडिकलच्या वाॅर्ड क्र. 46 मध्ये प्रसुतीसाठी दाखल होती. दोन दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला. प्रतीक्षाचा अमरावती जिल्ह्यातील सावरडी येथील गिरीश गोडाणे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. तो नेहमी प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत असे.
घटनेच्या दिवशी गिरीश वाॅर्ड क्र. 46 मध्ये आला. त्याने प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हातबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या शेजारी निजलेल्या दोन दिवसाच्या तान्हुल्या बाळाला उचलून त्याला फरशीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. जीवनकला नरेश मेश्राम (वय 50) यांनी दिलेल्या तक्रारी वरून अजनी पोलिसांनी भादंवि कलम 307, 323 अन्वये गुन्हा दाखल करीत गिरीश गोडाणे याला अटक केली आहे.
उपराजधानीत नववर्षालाच खून
नववर्षाचा प्रारंभ उपराजधानीत खूनाने झाला. एका कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत राजेश मेश्राम नामक व्यक्तीचा खून केला. दिवसाढवळ्या झालेल्या या खूनाने उपराजधानी हादरली आहे. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कमालचौकात ताेंडाला रूमाल गुंडाळलेल्या संशयित आरोपींनी मेश्रामवर धारदार शस्रांनी हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस या खूनामागच्या कारणांचा शोध घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.