आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारूच्या नशेत गाडी चालवत भरधाव बोलेरो पिकअपने भाजी बाजारात अनेकांना उडवत एका स्कूटी चालकाला 200 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. सोमवारी व्हीडिओ व्हायरल झाल्याने ही घटना उजेडात आली. आशीर्वाद नगर भागातील भाजी बाजारात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्या नंतर पोलिसांनी बोलेरो चालकाला अटक केली आहे.
भाजी मार्केटमध्ये धुमाकूळ
नागपूरच्या आशीर्वाद नगर परिसरातील भाजी बाजारात एका भरधाव बोलेरो पिकअप गाडीने एकापाठोपाठ एक पाच भाजीच्या ठेल्यांना उडवले. त्यात पाच भाजी विक्रेते जखमी झाले होते. भाजीच्या ठेल्यांना धडक देत बोलरो चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच गडबडीत त्याने समोर जाऊन एका स्कूटीला धडक देत सुमारे 200 मीटर फरफटत नेले होते.
या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली व शाळकरी मुले थोडक्यात वाचल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बोलेरों दोन्ही ठेले उडवताना आणि स्कूटी फरफटत नेताना स्पष्ट दिसून येत आहे. पहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव बोलेरो गाडी भाजी बाजारात घुसून भाजीचे ठेल्यांना उडवत असल्याचे तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजीच्या ठेल्यांना उडवल्यानंतर बोलेरो गाडी ठाकरे विद्यालयाकडे एका स्कूटीला तब्बल 200 मीटरपर्यंत फरफटत घेऊन जाताना दिसत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणाचाही जीव गेला नसून काही शाळकरी मुले थोडक्यात बचावल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे.
चालक होता मद्यधुंद अवस्थेत
ही घटना घडली त्यावेळी बोलेरो चालक मद्यधुंद असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या आरोपी चालकाला अटक केली आहे. निष्काळजीपणे गाडी चालवून इतरांना दुखापत करण्याच्या आरोपात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिकडे अशा घटनांत वाढ होत आहे. वाहनचालक भरधाव गाड्या चालवून झालेल्या अपघातात निष्पापांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.