आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरमधील विचारवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते वीरा साथीदार यांना आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'कोर्ट' सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली. 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला होता.
वीरा साथीदार हे मूळ वर्धा जिल्ह्यातील होती. मात्र नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीमध्ये त्यांचे बालपण गेले, तिथेच ते मोठे झाले. घरी अठरा विश्व दारिद्र असतानाही त्यांच्या आईने त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचे वडील नागपूरच्या रेल्वे स्थानकावर हमाली, तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करायच्या.
वीरा साथीदार यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ हरपला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदारांवर जबरदस्त पगडा होता. त्यांनी आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही गायली आहे. अनेक ठिकाणी ते या विषयावर व्याख्यानही देत असत.त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. हे करत असताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.