आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 काढताच निघू लागले 2500:ATMचा 'चमत्कार' पाहून नागपुरात तोबा गर्दी; मध्यरात्रीपर्यंत लागल्या रांगा

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा गावातील एटीएममध्ये अक्षरशः चमत्कार पाहायला मिळाला. ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी पाचशे रुपयांचा आकडा टाकला की, ते पैसे निघायचेच. सोबतच त्यानंतर जास्तीचे अडीच हजार रुपये बाहेर यायचे. त्यामुळे या एटीएमवर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली.

नेमके प्रकरण काय?

खापरखेडा गावातील शिवा कॉम्प्लेक्समध्ये अ‌ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी पाचशे रुपये काढले की, ती रक्कम निघायचीच. सोबतच इतर अडीच हजार रुपये निघायचे. ही बातमी सगळीकडे पसरली. याचा फायदा अनेकांनी घेत पैसे काढले. विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर बँकेतून मोबाइलवर कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही.

अफलातून ऑफर

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लेवाडा येथील एक तरुण एच.डी.एफ.सी.च्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून परत जात होता. तेव्हा कोराडी येथील एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने त्याला 500 रुपये मागून 1 हजार रुपये देतो, असे सांगितले. तरुणानेही त्याला पैसे दिले. यानंतर तो युवक एटीएममधून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि तरुणाने त्यातील हजार रुपये दिले. त्याने सर्व प्रकार सांगून पैसे काढून दाखविले.

रात्रीपर्यंत गर्दी

खापरखेड्यातील एटीएमवरून अनेकांनी पैसे काढले. त्यानंतर या एटीएमची कीर्ती सर्वदूर पसरली. पहाटे तीन वाजता नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी एटीएमकडे पैसे काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला.

बँक अधिकारी म्हणतात...

पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी बुधवारी तिथे पोहोचून एटीएमची तपासणी केली. दरम्यान किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, पैसे काढणाऱ्या एटीएमधारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...