आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्तीरोगग्रस्तांना विशेष चपलांचे वितरण:नागपूर ठरले देशातील पहिले शहर, रुग्णांना मोठा दिलासा

नागपूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हत्तीरोग हा जीवघेणा आजार नसला तरी कायमचे अपंगत्व प्रदान करून शरीर विद्रुप करणारा आजार आहे. या आजारामुळे पायाचा आकार विक्राळरित्या वाढतो. विशाल आकाराच्या या पायांना लागणाऱ्या चपलांचा आकार मिळणे कठीण असल्याने हत्तीरोगग्रस्तांना अनवाणी पायानेच भटकंती करावी लागायची. या सर्व परिस्थितीवर आता मात्र दिलासादायक समाधान मिळाले आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या पुढाकारामुळे रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या सहकार्यामुळे हत्तीरोगग्रस्तांसाठी विशेष चपला उपलब्ध करून देत त्यांचे वितरण करण्यात आले आहे.

मनपा आयुक्तांनी स्वत: या चपला वितरीत करीत बाधितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, हत्तीरोगग्रस्तांना विशेष चपलांचे वितरण करणारी नागपूर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणांचे वितरण प्रकल्पाची गुरूवारी सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जागतिक आरोग्य संघटनेच्या समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे अध्यक्ष डॉ. विकास इंगळेआदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्वतः हत्तीरोगग्रस्त रुग्णांना चपला घातल्या. नागपूर महानगरपालिकेतर्फे मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एमएमडीपी क्लिनिक हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमएमडीपी क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. याशिवाय हत्तीरोग आजाराविषयी आणि त्यापासून बचावासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक गोळ्यांच्या संदर्भात जनजागृती केली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मनपातर्फे हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेला मिळालेल्या सहकार्यामुळे शहरातील काही भाग हत्तीरोगमुक्त झालेला आहे. मात्र अजूनही काही भागांमध्ये या आजाराचा प्रभाव दिसून येतो. संपूर्ण शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन सारख्या संस्थांनी अशा मानवकल्याणकारी उपक्रमासाठी पुढे येणे ही अत्यंत चांगली बाब असून इतरही संस्थांनी याचे अनुकरण करून नागपूर शहराला स्वस्थ बनविण्यात सहकार्य करावे, असे आवाहन राधाकृष्णन बी. यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांनी केले. सध्या नागपुरात हत्तीरोगाचे 837 रुग्ण आहेत. त्यापैकी 100 अत्यंत गरजू रुग्णांना रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनच्या वतीने विशेष पादत्राणे देण्यात आली आहेत. सर्वप्रथम २५ रुग्णांना ही पादत्राणे वितरीत करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...