आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:नागपूरहून निघालेल्या शिवशाही बसला आग; प्रसंगावधानाने 16 प्रवाश्यांचा जीव वाचला, दोन महिन्यातील दुसरी घटना

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावती जाणाऱ्या शिवशाही बसला आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आग लागली. बस कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना अचानक गाडीतून धूर येत गाडीने पेट घेतला. मात्र, चालकांच्या प्रसंगावधानाने गाडीतील प्रवासी बचावले. चालकाने ब्रेक लावत गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

नेमकी घटना काय?

नागपूर ते अमरावती जाणारी शिवशाही बस (एमएच- 06, बीडब्लू- 0788) सकाळीच नागपूरहून निघाली होती. गाडी कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक अब्दुल जहीर शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बस लगेच रस्त्याच्या कडेला लावली, यावेळी वाहक (कंडक्टर) उज्वल देशपांडे यांनी गाडीतील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यावेळी गाडीत असलेले 16 ही प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान प्रवासी गाडी खाली उतरताच आगीने उग्र रूप धारण केल्याने यात जळून संपूर्ण बस भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तो पर्यंत बस संपूर्णपणे जळून खाक झाली होती. यानंतर एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसने प्रवाश्यांना पुढे पाठविण्यात आले.

महिनाभरात दुसरी घटना

शिवशाही बसच्या मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या अन् धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवित बस थांबवित प्रवाशांना पटापट बसच्या बाहेर काढले. फायर इंस्टिग्यूशरने आग विझविली. शिवशाही बस (एमएच 06, बीडब्ल्यू-0289) अमरावती डेपोची आहे. चालक अमोल मोहरकार आणि वाहक लाईक खान यांच्यावर बसची जबाबदारी होती. ही बस नागपुरच्या गणेशपेठ डेपोतून अमरावतीसाठी निघाली. बसमध्ये आठ प्रवासी होते. वाडीमार्गे निघालेल्या बसने गोडखैरी टोल नाका ओलांडल्यावर मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या आणि धूर निघू लागला. वाऱ्याने धुर पसरत होता.

यापूर्वी देखील शिवशाहीला आग

शिवशाही बसला आग लागण्याच्या घटना नेहमी समोर येत असतात. पुण्यात 1 नोव्हेंबर 2022 रोजी अत्यंत रहदारीच्या असलेल्या शास्त्रीनगर परिसरात शिवशाही बसला आग लागली होती. तर 4 ऑक्टोबर 2019 मध्ये देखील पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसला कात्रज घाटात आग लागल्याची घटना घडली होती.