आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात कोरोना लशींचा तुटवडा:स्टॉक संपल्यामुळे लसीकरण बंद, वाढत्या कोराेना रुग्णांमुळे महापालिका पेचात

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद नसल्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा बंद करण्यात आला. परंतु, आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे पुन्हा लसीकरणाची गरज भासू लागली आहे. मात्र, लसींचा स्टॉक नसल्यामुळे महापालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे.

चाचण्या वाढवण्याचे निर्देश

वाढता कोरोना पाहता नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी बाधितांच्या संख्येमुळे तातडीची आढावा बैठक घेऊन चाचण्यांसोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सुरुवातील नागपूरकरांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत उदासीनता होती. परंतु, आता कोरोना वाढत असल्याने केवळ पहिला डोस घेतलेल्यांनी दुसऱ्या डोससाठी तर दुसरा डोस घेतलेल्यांनी बुस्टर डोससाठी विचारणा सुरू केली. परंतु महापालिकेकडे लसच नसल्याने सर्वच लसीकरण केंद्र बंद पडले आहेत.

बाधितांचा आकडा तीन अंकी

गेल्या तीन दिवसांत कोरोना बाधितांची संख्या तीन अंकावर पोहोचली रूग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 84 नवे बाधित आढळले. यात शहरात 54 व ग्रामीणमध्येही 28 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

लसींचा तूटवडा

यासंदर्भात माहिती देताना महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट पुन्हा येणार नाही, या आविर्भावात नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरवली. परिणामी, राज्य सरकारनेही पुरवठा बंद केला. त्यामुळे आता लसच नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. आतापर्यंत शहरातील 100 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र, अजूनही 18.49 टक्के नागरिकांनी दुसरा तर 75.43 टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला नाही.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यात महापालिकेने लसीची मागणी केली. परंतु राज्य सरकारकडे लस उपलब्ध नसल्याने लसीकरण नेमके केव्हा सुरू होईल, याबाबत स्पष्टता नसल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले.

आतापर्यंतचे लसीकरण

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या : 21 लाख 94 हजार 740

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या : 17 लाख 84 हजार 367

बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या : 4 लाख 14 हजार 755