आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:राज्यात कोरोनामुळे तब्बल 195 बालके झाली अनाथ; महिला व बालविकास खाते घेणार जबाबदारी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई-वडील गमावलेल्यांची संख्या 108, नंदुरबारमध्ये सर्वाधिक

राज्यात कोरोनामुळे सुमारे १९५ बालके अनाथ झाली आहेत. या बालकांची जबाबदारी महिला व बालविकास खात्यातर्फे घेतली जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. १९५ मध्ये आई - वडील गमावलेल्या मुलांची संख्या १०८ आहे, तर एकच पालक गमावलेली मुले ८७ आहे. सगळ्यात जास्त अनाथ झालेल्या मुलांची संख्या नंदुरबार जिल्ह्यातील आहे. नंदुरबार येथे ९३ मुले अनाथ झाली आहेत. त्यातील ६६ मुलांनी आपले आई- वडील, तर २७ मुलांनी एक पालक गमावले आहे. पालकत्व गमावलेल्या बालकांची ही आकडेवारी रविवारपर्यंतची आहे. मात्र, हे आकडे आणखी वाढू शकतात असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हास्तरावर कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पालकांना गमावलेल्या १९५ पैकी ४२ जणांची जबाबदारी राज्य सरकारने आधीच घेतली आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक मृत्यू पावल्यामुळे अनाथ झालेली बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी व अनाथ बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून अशा मुलांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांचा प्रश्न गंभीर झाल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे. हा टास्क फोर्स त्या त्या जिल्ह्यातील मुलांची जबाबदारी पाहणार आहे.

महापालिकांना मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्रात अशा बालकांची व्यवस्था महिला व बालविकास शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह येथे करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ चा फलक लावणे, कोरोना उपचारासाठी भरती होताना पालकांकडून आपल्या पाल्याचा ताबा कोणाकडे द्यावा याची माहिती संबंधित पालक वा रुग्णाकडून भरून घेण्यास सांगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हानिहाय अनाथ झालेल्या बालकांची संख्या
नंदुरबार ९३
हिंगोली १८
जालना १६
गोंदिया १२
ठाणे ११
अहमदनगर ८
नागपूर ७
परभणी ४
पुणे ४
धुळे ३
बुलडाणा ३
पालघर २
रत्नागिरी २
सिंधुदुर्ग २
वाशीम २

बातम्या आणखी आहेत...