आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका अनोळखी व्यक्तीने दिलेल्या चॉकलेट्स खाल्ल्यामुळे येथील मदन गोपाळ अग्रवाल हायस्कूलमधील तब्बल 17 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेला तीन दिवस होऊनही चाॅकलेट वाटणाऱ्याचा शाेध पोलिसांना लागलेला नाही. मुलांच्या वेगवेगळ्या सांगण्यामुळे वेळ लागत असल्याची माहिती बर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
नागपूरच्या मदन गोपाळ अग्रवाल हायस्कूल या शाळेत हा प्रकार घडला. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक काळ्या रंगाची कार शाळेबाहेर येऊन थांबली. या कारमधून तोंडावर मंकी कॅप घातलेली एक व्यक्ती उतरली. या व्यक्तीने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटली आणि संबंधित व्यक्ती तिथून निघून गेला. ही चॉकलेट्स मुलांनी खाल्ली. एक-दोन चॉकलेट्स खाल्लेल्या मुलांना फारसा त्रास जाणवला नाही.
सुदैवाने हानी टळली
मात्र, अनोळखी व्यक्तीकडून चार ते पाच चॉकलेट्स घेऊन खाल्लेल्या मुलांना त्रास जाणवायला लागला. ही बाब शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मुलांना नजीकच्या लता मंगेशकर रुग्णालयात तातडीने दाखल केले. येथील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले. तेव्हा या शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने एकाही मुलाची प्रकृती गंभीर झाली नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनाही हा प्रकार नंतर माहिती झाला. त्यामुळे त्यांनीही अधिक काही बोलण्यास नकार दिला.
बालरुग्ण विभागाबाहेर पालकांची गर्दी
या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी लता मंगेशकर रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयातील बालरुग्ण विभागाबाहेर पालकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेतबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांना चॉकलेटस वाटणारी व्यक्ती नेमकी कोण होती, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
संवेदनशीलतेने तपास सुरू
प्रत्येक मुलगा वेगळे काहीतरी सांगत असल्याने नेमके चित्र स्पष्ट होत नाही. मुलांवर जास्त जोर टाकता येत नाही. लहान मुले असल्याने संवेदनशीलतेने तपास सुरू आहे
- अतुल सबनीस, ठाणेदार, बर्डी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.