आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्याला घेराव:पोलिसांच्या दबावामुळे तरुणाची गळफास लावून आत्महत्या; संतप्त नागरिकांचा आरोप

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रामटेक तालुक्यातील देवलापार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पेंढरई गावातील एका 31 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या दबावाने व धमकावल्याने गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप करीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांनी देवलापार पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

नागरिकांच्या उपस्थितीत रामटेक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. गळफास लावलेल्या व्यक्तीने पोलिसांच्या दबावाने गळफास लावल्याचा आरोप देवलापार पोलिसांवर यावेळी करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, देवलापार पोलिस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मृतकास फोन कॉल करून धमकी देऊन दबाव टाकला होता. तसेच महिला पोलिस कर्मचारी लक्ष्मी घोडके या मृतकाच्या घरी गेल्या.

मृतकाच्या आईने पोलिसांना घरी येण्याचे कारण विचारले असता, उपस्थित पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तिला अश्लील शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली व घरात प्रवेश केला. तेव्हा घरात युवकाने फाशी लावल्याचे आढळून आले. त्यानंतर उपस्थित पोलिसांनी घरात शिरून बॅगमधून मृतकाचे बँक ऑफ इंडियाचे पासबुक, आधार कार्ड व 9921634700 क्रमांकाचा मोबाईल सोबत घेऊन गेले.

ही सर्व घटना संशयास्पद असून मृतकाच्या विरुद्ध कोणती तक्रार होती? मृतकावर गुन्हा दाखल केला होता का? तक्रारदार कोण होते? तपास कुणाकडे होता? या सर्व गोष्टीची माहिती पोलिसांनी न देता सरळ मृतकाला धमकाविणे, घरी येऊन मृतकाच्या आईला धक्काबुक्की करून शिवीगाळ करणे, बेकायदेशीररित्या घरून कागदपत्रे, मोबाइल घेऊन जाणे हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद आहे असा निवेदनात स्पष्ट उल्लेख आहे.

या संपूर्ण घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आदिवासी भागात पोलिसांविरुद्ध असंतोष निर्माण झालेला आहे. हरीश उईके व नागरिकांनी केलेल्या आरोपांमुळे पोलिसांची जबाबदारी कायदेशीररित्या समाजाला संरक्षण देण्याची आहे की, कसलीही चौकशी न करता एखाद्या गरीब व्यक्तीला धमक्या देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याची आहे? असा सवाल जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांनी केला आहे.

दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवध, अनुसूचित जमाती अधिकार उल्लंघन व अपमान करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही हरिश उईके यांनी केली आहे. कारवाई न केल्यास गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी हरीश उईके यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...