आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सजले शहर:सी-20 परिषदेनिमित्त महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या परंपरांचे आकर्षक देखावे

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात येत्या आठवड्यात जी-20 परिषदेंतर्गत आयोजित होणाऱ्या सी-20 परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासह शहराला नववधूसारखे सजवण्यात येत आहे. शहरात विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुशाेभिकरणाची कामे पूर्ण होत आली आहेत. यावेळी महाराष्ट्र आणि नागपूर जिल्ह्याची ओळख असणाऱ्या प्रतिमांचे देखावे उभारण्यात आले आहेत.

विशेषत: सिव्हिल लाईन परिसरात सी-20 मध्ये सहभागी देशांचे झेंडे लावण्यात आले आहे. विमानतळावरही सुशोभिकरणाची कामे पूर्ण होत आली आहेत. पाहुण्या देशांचे ध्वज, टायगर कॅपिटलची ओळख दर्शविणारी वाघाची प्रतिमा, स्वागतासाठी उभे असलेल्या महाराष्ट्राच्या पांरपरिक वेशातील दांपत्य, प्रसिद्ध लोकनृत्य लावणी चितारण्यात आलेली आकर्षक चित्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष लागवडीची कामे पूर्ण झाली आहे.

राज्याच्या परंपरेच्या प्रतीमा

विमानतळातून बाहेर पडताच जी-20 परिषदेच्या सदस्य देशांचे ध्वज आणि नागपुरात सी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत करणारे ध्वज झळकले आहेत. विमानतळाच्या नाम फलकाखालील परिसरात वर्तुळाकार, त्रिकोणी आणि वेटोळया आकाराची टॉपअरी झाडे लावण्यात आली आहेत. पोर्चमधून बाहेर निघतांना पाहुण्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेतील उभे असलेल्या दांपत्यांची चित्रे चितारण्यात आली आहेत.

वाघाची प्रतिमा प्रवाशांचे आकर्षण

महाराष्ट्राचा गौरव असलेली लावणी नृत्याची झलकही येथे दिसून येते. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या निरुपयोगी भागांपासून निर्मित वाघाची प्रतिमा येथील टर्मिनल मेनडोम परिसरात लावण्यात येणार आहे. टायगर कॅपीटल ही नागपूरची ओळख दर्शविणारी ही प्रतिमा आतापासूनच प्रवाशांसाठी आकर्षण ठरत आहे.

5 हजार कुंड्यांनी सजला परिसर

सी-20 परिषदेचे प्रतिनिधी विमानातून बाहेर पडल्यापासून पोर्चमध्ये येईपर्यंतच्या परिसरात बकुळ, रॉयल पाम, ट्रॅव्हलर पाम आदी 14 प्रजातींची वृक्षे पाच हजार कुंड्यांमध्ये लावण्यात आली आहे. जी-20 च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय भाषेत नागपुरात आपले स्वागत आहे हा संदेश असणारे मोठे फलक लावण्यात येणार आहे.

मेट्रोखाली आदिवासींचे पुतळे

वर्धा रोडवरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान विदर्भातील आदीवासी व त्यांची गौरवशाली परंपरा दर्शविणारे देखावे लावण्यात आले आहेत. उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान आदिवासींचे लोकजीवन व समृद्ध परंपरा दर्शविणारे धातुंचे आकर्षक देखावे लावण्यात आले आहे.

छत्रपती चौक मेट्रो स्टेशन मार्गीकेच्या पीलर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा देखावा लावण्यात येत आहे. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन पीलर दरम्यान पेंच अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील प्राणी, मोगली हे प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिकेतील पात्र व जैव संपदा साकारण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...