आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड:नागपुरातील हवाला, डब्बा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे; 150 जणांच्या पथकाने घेतली झाडाझडती

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातील हवाला आणि डब्बा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे पडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या सुमारे १५० जणांच्या पथकाने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाड टाकल्याने व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पाहायला मिळाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरातील हवाला आणि डब्बा व्यापारी रवी अग्रवाल, शैलेश लखोटीया पारस जैन, लाला जैन, प्यारे खान, करनी थावरानी, गोपी मालु, हेमंत तन्ना, इजराइल सेठ, सीए रवी वानखेडे आदींचा समावेश आहे.

रवी अग्रवाल यांचा कारभार मुंबईपर्यत पसरला आहे. भव्यदिव्य आयोजनांसाठी प्रसिद्ध असलेला रवी अग्रवाल यांचा छतरपूर फाॅर्म प्रसिद्ध आहे. २०१५ मध्ये डब्बा कारभारात अग्रवालचे नाव पहिल्यांदा समोर आले होते. त्यावेळी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ईडीनेही अग्रवालचा तपास केला होता. त्यात आढळलेली कागदपत्रे आयकर विभागाच्या सुपूर्द केली होती. त्याच आधारे बुधवारची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.

नागपुरात अनेक वर्षांपासून हवाला आणि डब्बा गँग सक्रिय आहे. रवी अग्रवालची एल-७ ही कंपनी या कारभारात २००८ ते २०१५ दरम्यान पूर्णपणे सक्रिय होती. सर्वात पहिले अग्रवाल नागपूर पाेलिसांच्या तावडीत सापडला होता. तत्कालीन महिला डीसीपी दीपाली मासूरकर यांनी कडक कारवाई केली होती. या डब्बा गँगमध्ये अग्रवाल सोबत करनी थावरानी, गोपी मालू, हेमंत तन्ना, इजराइल सेठ हेही सहभागी होते.

प्यारे खानच्या नावाने आश्चर्य

बुधवारी ट्रान्सपोर्ट व्यापारी प्यारे खानकडेही आयकर विभागाची धाड पडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाजपाच्या अत्यंत जवळचा असलेल्या प्यारे खान यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायत कमी कालावधीत नजरेत येईल इतने यश मिळवले आहे. त्यांच्या विरोधात हवाला कारवाईत इनपूट मिळाल्याचे सांगण्यात येते.