आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध क्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या महिला आता ‘स्लम’मधील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. ‘महिला कट्टा’च्या महिलांनी यासाठी ॲक्शन प्लान तयार करण्यास सुरुवात केली असून पुढील बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल आणि ॲक्शन प्लाननुसार प्रत्यक्ष कार्याला सुरुवातही होईल, अशी माहिती महिला कट्टाच्या संयोजिका नगरसेविका प्रगती पाटील यांनी दिली.
महिला कट्टाची संकल्पना मांडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांच्यासह अरूणा सबाने, सना पंडित, जया अंभोरे, ॲड. सेजल लाखानी,आदींचा या उपक्रमात सहभाग राहाणार आहे.
महिलांनी सहभाग घ्यावा
याप्रसंगी महिला कट्टाच्या संयोजिका प्रगती पाटील यांनी महिला कट्टा संकल्पनेमागील उद्देश सांगताना पुढील कार्याची दिशा कशी राहील, याबाबत उपस्थितांना माहिती दिली. आता बैठकांसोबतच प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे जी क्षेत्र कार्यासाठी निवडली आहेत आणि ज्या महिलांना त्या क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी अन्य महिलांचा ग्रुपमध्ये सहभाग घ्यावा. एका महिन्यात ग्रुपच्या माध्यमातून ॲक्शन प्लान तयार करण्यासंदर्भात माहिती दिली. अरुणा सबाने यांनी महिला कट्टाच्या विविध क्षेत्रासाठी दिलेल्या जबाबदारीची माहिती दिली.
चर्चेतून पुढे आले विविध उपक्रम
महिला कट्टाच्या माध्यमातून वर्ग आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळीसंदर्भात शिक्षण, मुलगा मित्र नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या मुलींचे समुपदेशन, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने वस्ती तेथे बाजारपेठ आदी विषयांवर काम केले जाणार आहे. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे तयार करण्यासाठी पुढाकार घेणे आणि कपड्यांची बँक सुरू करणे या विषयांवर सामूहिकपणे कार्य करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
क्षेत्र आणि जबाबदाऱ्या
विविध क्षेत्रासाठी यावेळी महिलांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या. ग्रामीण क्षेत्रात कार्य करण्याची जबाबदारी कल्पना मानकर यांना देण्यात आली. सामाजिक क्षेत्रासाठी अरुणा सबाने, सना पंडित, ॲड. सेजल, आरोग्य क्षेत्रासाठी डॉ. सुषमा देशमुख, शुभदा फडणवीस, शिवांगी गर्ग, ममता जयस्वाल, क्रीडा क्षेत्रासाठी देवयानी जोशी, शिक्षण क्षेत्रासाठी अनघा वैद्य, आभा मेघे, राजकारण क्षेत्रासाठी वंदना भगत, दिव्या धुरडे, सक्षमीकरण या क्षेत्रासाठी जया देशमुख, पर्यावरण अनसुया काळे आदींना जबाबदारी सोपविण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.