आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती, मुलांचे शिक्षण तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी सुमारे ५० हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्यात येणार आहे. संपूर्ण देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून येरवडा कारागृहानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर तुरुंगात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी “दिव्य मराठी’ला दिली. याशिवाय कैद्यांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून ३१ जणांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती देसाई यांनी दिली.
महाराष्ट्रातील तुरुंगात सध्या शिक्षा ठोठावण्यात आलेले ४,७९३ पुरुष व १४४ महिला असे एकूण ४,९३७, अंडरट्रायल असलेले २७,०९२ पुरुष व १,२२४ महिला असे एकूण २८,३१६ व डिटेन केलेले १७४ पुरुष व १ महिला असे एकूण १७५ कैदी आहेत. या सर्वच बंदिवानांना या योजनेचा लाभ होणार आहे. येरवडा कारागृहात सध्या ६ हजार कैदी आहेत. त्यापैकी ४ हजार कैद्यांनी या योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
व्यावसायिक कौशल्य रोजगार प्रशिक्षणानंतर कैदी तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याला उपजीविकेसाठी रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र बँकेतर्फे कर्ज देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर दोन वर्षांपर्यंत त्याच्या संपर्कात राहून संपूर्ण मदत करण्यात येणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.
वाहन दुरुस्ती ते शेेळीपालन ३० कोर्सेस शिकवणार : महाराष्ट्र बँकेच्या सहकार्याने ३० प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये दुचाकी वाहन दुरुस्ती, मोबाइल रिपेअरिंग, ब्यूटी पार्लर, पापड-लोणचे उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन आदींचा समावेश आहे.
कैद्यांना दिले जाईल प्रशिक्षण, मुक्त झाल्यावर करता येईल व्यवसाय
कारागृहातून बंदी मुक्त होऊन समाजात आल्यावर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रची संस्था असलेल्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येईल. कारागृहातून मुक्त झाल्यावर या प्रशिक्षित बंद्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाईल. ते कर्ज व्यवसायात कमाई करून परतफेड करावे, अशी ही अभिनव योजना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.