आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळाभेट:मी स्वत: निवडून आलो तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने झाला - देवेंद्र फडणवीस

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. या विजयावर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळेंच्या विजयाने मला स्वतःच्या विजयापेक्षाही जास्त आनंद झाला असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी गळ्यात हार घालून बावनकुळेंचे अभिनंदन देखील केले आहे. यावेळी बावनकुळेंनी भावूक होऊन देवेंद्र फडणवीसांना मिठी मारली. यावेळी फडणवीसांना देखील गहिवरुन आल्याचे पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीला चपराक

नागपुरातील जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा विजय झाला आहे. खरेतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा देखील जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयामुळे झाला आहे. या विजयाने महाविकासआघाडीला चपराक बसली आहे.'

बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी
फडणवीस यांनी भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देत असताना महाविकास आघाडीला टोलाही लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, नागपूरसह अकोल्यामध्येही भाजपचा उमेदवार निवडणून आला आहे. वसंत खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला. विधानपरिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजपचा विजय झालेला आहे. यामुळे महाविकासआघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सर्व प्रकारचे विजय होऊ शकतात, असे जे गणित मांडले जात आहे ते चुकीचे आहे हेही या विजयामुळे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यातील जनता भाजपच्या पाठीशी आहे. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी असल्याचे मतही फडणवीसांनी मांडले आहे.

विधानसभेच्या वेळी भाजपने बावनकुळेंना नाकारले होते तिकीट
विधानसभेच्या निवडणुकांच्या भाजपकडून काही महत्वाच्या नेत्यांची तिकीटे कापण्यात आली होती. यामध्ये माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील समावेश होता. पक्षातील बड्या नेत्याचे तिकीट कापल्यामुळे त्यावेळी बरीच चर्चा देखील झाली होती. यावेळी बावनकुळे हे नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. मात्र त्यांनी माध्यमांसमोर येत पक्षावर नाराज नसल्याचे म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र यावेळी भाजपने बावनकुळे यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि विधानपरिषदेच्या जागेसाठी त्यांना मैदानात उतरवले. यामध्ये त्यांचा दणदणीत विजय झाला आहे. पक्षाने पूर्ण नियोजनाने बावनकुळे यांना मैदानात उतरवल्याचे यावरुन स्पष्ट झाले.

बावनकुळेंना मिळाली 362 मते
विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या निवडणुकांची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये दोन्हीही जागांवर भाजपने बाजी मारली आहे. नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर आघाडीने भाजपचे माजी नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट दिले होते. मात्र भाजपचा नगरसेवक फोडूनही काँग्रेसला यश मिळू शकलेले नाही. येथे चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते तर कॉंग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते पडली. तर कॉंग्रेसचे अधिकृत छोटू भोयर यांना 1 मत मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...